शब्द समानार्थी व्याख्या
  १. देवनागरी लिपीतील आणि मराठी वर्णमालेतील पहिला वर्ण. २. मराठी स्वरमालेतील पहिला स्वर, स्थानपरत्वे ऱ्हस्व, लांबट किंवा निभृत : ‘गवत’ या शब्दातील ‘ग’ मधील ‘अ’ हा ऱ्हस्व, ‘व’ मधील ‘अ’ हा लांबट, ‘त’ मधील ‘अ’ हा तोटका किंवा निभृत होय. ३. ॐ या अक्षराच्या ‘अ’, ‘उ’, ‘म्’ या तीन घटकांमधील पहिला. हा विष्णूचा निदर्शक मानला जातो. [सं.]
उपसर्ग. १. व्यंजनादी शब्दांपूर्वी लागणारा, सामान्यतः नकार, अभाव, अल्पत्व, अनौचित्य आणि अन्यत्व दाखविणारा उपसर्ग. अन्याय (नकार); अधर्म (अभाव); अगोड (अल्पत्व); अवेळ (अनौचित्य); अहिंदू (अन्यत्व). स्वरादी शब्दांपूर्वी त्याचे रूप ‘अन्’ असे होते : अनर्थ, अनपेक्षित, व्यंजनांनी सुरू होणाच्या शब्दांपूर्वी क्वचित त्याचे हे रूप वापरलेले आढळते. अनहित, अनमोल. २. मराठीत ‘अ’ हा उपसर्ग क्वचित अतिशयत्व दाखवतो. अघोर, अचपळ. ३. मूळ स्थितीला जाणे : असुजणे = सूज उतरणे; अहारणे = सुटे होणे.
वि. इयत्ता अथवा गुणवत्ता दाखवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह : ‘अ’ तुकडी, ‘अ’ वर्ग इत्यादी. [सं.]
अ आ :   प्रारंभिक ज्ञान; ओ का ठो.
अई उद्गार. दुःख - शोकदर्शक उद्गार.
अईन स्त्री. १. चांगली कुळी; चांगली वर्तणूक; शिष्टाचारयुक्त किंवा रुबाबदार वर्तन. [फा.]
अईसभईस वि. अद्‌भुत (गोष्ट).
अउडबारा वि. (अउड = औट म्हणजे साडेतीन. साडेतीन हात म्हणजे एक पुरुष उंचीचे माप. यावरून) बारा पुरुष : ‘कृष्णें बाण सोडिला तिधारां । रुक्मियासी लागला पिसारा । मागे सारिला अउडबारा । शक्ति अंबरा उडविली ॥’ – एरुस्व १२·१२१.
अउणापाउणा वि. अर्ध्याने किंवा पावाने कमीअधिक; साधारणपणे संख्येच्या संदर्भात उपयोग केला जातो. [सं. अर्धानपादोन]
अउले न. प्रेमाचे बोलावणे.
अउड पु. नांगर; औत.
अक न. दुःख; पाप.[सं.]
अकचाट वि. अतिकारस्थानी : ‘नावडे शास्त्री अकचाट नावडे चातुर्य वटवट I’ – भारा ८·७.
अकच्छ वि. कासोटा न घालता नेसलेले (धोतर, लुगडे इ.). [सं.]
अकट वि. विशेष चिकित्सा करणारा; हट्टी
अकटचिकट वि. १. विशेष चिकित्सा करणारा; बारीकसारीक तपशिलात शिरणारा. २. आग्रही; हट्टी; चिकट; चेंगट, [चिकटचे द्वि.]
अकटी स्री. लहान शेगडी; आगटी; शेकोटी. [सं. अग्निष्टिका]
अकटेदुकटे न. ठिकरीचा खेळ.
अकटोविकट वि. १. प्रचंड; फार मोठा व ओबडधोबड; अवाढव्य; बेढब; अगडबंब. २. अक्राळविक्राळ; भयप्रद; भयानक. ३. (उप.) अत्यल्प; अतिशय थोडे. [विकटचे द्वि.]
अकड   पहा : अक्कड (अकड व त्यापासून तयार झालेले सर्व शब्द ‘अक्कड’ मध्ये पहा.) [सं. आकृति]
अकडकडवे न. गाण्यातील पालुपद; ध्रुवपद; आंकणकडवे.
अकडणे अक्रि. १. ऐट करणे; डौल मिरवणे; नखरा करणे. २. पहा : आखडणे : ‘दररोज सकाळी अकडणाच्या कमरेला …’ -शिळान १२७.
अकडबाज वि. ऐटबाज; गर्विष्ठ.
अकडंतिकडं न. १. वायफळ बडबड. २. टाळाटाळ; चुकवाचुकवी.