शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी वर्णमालेतील सातवा, वैदिक व संस्कृत भाषेत आढळणारा, नंतरच्या अवस्थांत नष्ट झालेला ‘र’ या व्यंजनाशी मिळता स्वर.
ऋक् पु. चार वेदांपैकी पहिला वेद; ऋग्वेद : ‘म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तीन्ही म्हणे मी आत्मारामु ।’ − ज्ञा ९·२७७. [सं.]
ऋक् स्त्री. ऋग्वेदातील ऋचा, मंत्र; सूक्तातील एक भाग; वेदातील छंदोबद्ध रचना. [स.]
ऋख न. नक्षत्र : ‘चांदीं ऋखै जैसिं । दिनोदइं ॥’ − राज्ञा १५·२८२.
ऋखी पु. ऋषी : ‘ऋखीं पळो लागले.’ − श्रीकृच १६.
ऋग्वेद पु. चार वेदांपैकी पहिला वेद. ऋग्वेदाची एकंदर सूक्ते १०२८ असून एकंदर ऋचा १०५८० व अक्षरसंख्या ४३२००० आहे. चारी वेदात ऋग्वेद मोठा आहे. ऋग्वेद हा हौत्रवेद असून यज्ञातील होता नामक ऋत्विजाने यातील मंत्र म्हणायचे असतात. [सं.]
ऋग्वेदी पु. ऋग्वेदाला अनुसरणारी ब्राम्हण वर्गातील एक शाखा. [सं.]
ऋचा स्त्री. १. ऋग्वेदसूक्तातील एक मंत्र, श्लोक : ‘बोलती निषेधनियमे जिया ऋचा यजुःसामें ।’ − ज्ञा १५. १६६. २. वेदांतील मंत्र : ‘ऋचा श्रुति स्मृति । अधेय स्वर्ग स्तबक जाती।’ − दास १२·५·४. ३. (संगीत.) यज्ञसमारंभप्रसंगी निमंत्रित देवता − इंद्र, वरुण, अग्नी वगैरेंना यज्ञाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांचे मनोरंजन करण्यासाठी गाऊन म्हणता याव्यात अशा रचना. [सं.]
ऋजु वि. १. सरळ; प्रत्यक्ष; उजू. २.(ल.) प्रामाणिक; निष्कपटी; साधा; अकृत्रिम; सच्चा. [सं.]
ऋजू वि. १. सरळ; प्रत्यक्ष; उजू. २.(ल.) प्रामाणिक; निष्कपटी; साधा; अकृत्रिम; सच्चा. [सं.]
ऋण न. १. कर्ज; देणे; रीण; परत द्यायच्या बोलीने (सव्याज किंवा तसेच) घेतलेले द्रव्य इ. २. (ल.) उपकार; अपरिहार्य कर्तव्य; पहा :ऋणत्रय : ‘ऋण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी I’ − तुगा १०.[सं.](वा.)ऋण करणे − कर्ज काढणे; कर्ज करणे.ऋण काढणे − पहा :कर्ज काढणे. ऋण फिटणे− कर्जमुक्त होणे; उपकाराची फेड होणे : ‘मेलों रणांत म्हणजे तुमचे याचेहि सर्व ऋण फिटलें ।’ − मोभीष्म ११·७४.ऋण फेडणे − कर्जाची सर्व रक्कम परत करणे; उपकारकर्त्याच्या उपकारांतून मुक्त होणे.
ऋण न. १. (ग.) बाद किंवा वजा करायचा अंक, रक्कम. २. वजाबाकीचे चिन्ह; उणे चिन्ह; उणी संख्या; वजा करायची संख्या. ३. (भौ.) विजेचा एक प्रकार; अपसारक विद्युत; धनविद्युतच्या उलट ऋणविद्युत; जवळ असलेल्या दोन पदार्थापैकी एकावर ऋणवीज असेल तर दुसऱ्यावर धनवीज उत्पन्न होते. [सं.]
ऋण अग्र न. (विद्युत.) विद्युतघटामधील ऋण विद्युतभारित अग्र.
ऋणकरी वि. १. कर्ज देणारा; सावकार; उत्तमर्ण. २. कर्ज घेणारा; देणेदार; ऋणको; अधमर्ण. ३. ज्यापासून काही उपयोग नाही पण ज्याला उगीच पोसावे लागते असा, कुचकामाचा माणूस; आळशी, आइतखाऊ अशाला निंदेने म्हणतात. ४. ज्याच्याकडून आपल्याला नेहमी मदत होते व जो सारखा आपल्यावर कृपा करीत असतो अशा माणसाला कृतज्ञतादर्शक बुद्धीने म्हणतात. ५. (ल.) एखाद्या गोष्टीबद्दल हटून बसणारा; हट्टी; आग्रही; घेतल्यावाचून न जाणारा. [सं. ऋण+कृ]
ऋणको पु. कर्ज असलेला; कूळ; अधमर्ण; रीणकरी. [सं. ऋण]
ऋणकोन पु. (भूमिती.) घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेच्या विरुद्ध बाजूला होणारा कोन.
ऋणग्रस्त वि. कर्जबाजारी, कर्जात बुडालेला. [सं.]
ऋणग्रस्तता स्त्री. कर्जात बुडणे, रुतणे; कर्जबाजारीपणा. [सं.]
ऋणघातकी वि. अवसानघातकी; ऐन वेळेवर माघार घेणारा. (ना.)
ऋणचित्र न. कॅमेऱ्याच्या छायापट्टीवर मिळणारे चित्र.
ऋणचिन्ह न. (शाप.) उणे चिन्ह (−). पहा :ऋण २. [सं.]
ऋणत्रय न. देवऋण, पितृऋण, ऋषिऋण. ही तीन ऋणे. [सं.]
ऋणत्वरण न. (भौ.) विरुद्ध दिशेने होणारी वेगवृद्धी.
ऋणन न. (ग्रंथा.) बाहेर दिलेले वाचनसाहित्य कुणाच्या नावावर आहेत्याची ग्रंथालयात केलेली नोंद.
ऋणनिर्देश पु. आभारप्रदर्शन.