शब्द समानार्थी व्याख्या
घंटापारधी पु. घंटानादाने हरिणास भुलवून फासात अडकविणारा पारधी: ‘घंटापारधी जैसा । मधुर नादें मृगमानसा । भुलवोनियां पाडी फांसा ।’ –भारा, बाल, २·२६.
घंटाबडव्या वि. (तुच्छतेने) पुजारी; पूजा करणारा: ‘कृष्णरावांच्या पदरीं गोविंदपंत नुसता घंटाबडव्या होता.’ –कोरकि ३५.
घंटाशास्त्र न. घंटा तयार करण्याचे व वाजविण्याचे शास्त्र.
घंटिक   (वै.) एक प्रकारची ग्रंथी.
घंटिका स्त्री. १. लहान घंटा; घागरी; घुंगरू. २. पडजीभ. ३. गळ्याची घाटी; गळ्याचा अस्थिमणी; कंठमणी; ग्रीवामणी: ‘माजि घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरू म्हणिपे । पंडुकुमरा ॥’ –ज्ञा ६·२०८. [सं.]
घंटी स्त्री. १. वाघ्यामुरळींचे एक वाद्य. २. लहान घंटा. [सं. घंटिका], ३. दळण्याचे जाते. पहा : घट्टी
घंटी अप्पा पु. दोन्ही हातांनी घंटा वाजवीत भीक मागत फिरणारा मनुष्य.
घंटीचोर पु. चोरांची एक जात; भामटा; उचल्या. [कर्ना.]
घंटी परिपथ   (विअ.) विद्युतघंटीचा आराखडा.
घंटेकाटा पु. घड्याळातील तासांचा काटा: ‘घड्याळांत घंटेकांटाच नाही.’ –श्रमसाफल्य २.
घंसन न. युद्ध: लढाई: धुमश्चक्री. पहा: घमशान ४ : ‘पुढीली अणीया भाले । जवळीं पांच पांच सेले । आडासनीं दोनी दोनी षर्गें । मोजे घंसनी पातलें ॥’ –उषा ८२४. [सं. घर्षण]
घाइ पु. १. ठोका; वाद्यांचा गजबजाट; संमिश्र ध्वनी; कोलाहल : ‘टिपरी गाजती घाई जाली ।’ – ज्ञागा १०. २. संगीतातील, वादनातील ताल, गती, बोल; विशेषतः द्रुतगती. (को.) [सं. घात, घाति], ३. प्रहार; घाव : ‘दुःखशोकांच्या घाईं । मारिलियाची सेचि नाही ।’ – ज्ञा ७·१०७. [सं. घात]
घाइटा पु. घाई; गडबड; त्वरा. (कर.)
घाइवट वि. जखमी.
घाइवट पु. घाव; जखम; वार; शस्त्राचा आघात. (प्र.) घायवटा.
घाई स्त्री. १. त्वरा; जलदी; गर्दी. २. तातडी; उतावीळ; धांदल; लगबग; घायकूत. ३. धामधूम; धडाका; गडबड; तडाखा. ४. धुमाळी; धुमाकूळ; धांगडधिंगा; धावपळ; गोंधळ; दंगा. (वा.) घाईस येणे – जिकिरीला येणे; त्रस्त होणे; त्रासून जाणे.
घाईगर्दी स्त्री. गोंधळ; धावपळ.
घाईघाईने क्रिवि. अगदी गडबडीने; गर्दीने; लगबगीने. [घाईचे द्वित्व]
घाउस पु. १. घास; लचका : ‘जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस ।’ – ज्ञा ६·२३१. २. खाणारा; ग्रहण करण्यास उत्सुक. ३. खाण्याची इच्छा. [सं. घस् = खाणे]
घाऊक वि. १. ठोकळ; भरीव; मोठी (रक्कम, संख्या, आकडा). २. सगळा; सर्वच्या सर्व; अशेष; उक्ता; उघडा. ३. ठोकविक्रीने; एकठोक; ठोकबंद. ४. मोठ्या प्रमाणावरचा : ‘हे दंगे तसे निकराचे किंवा घाऊक नव्हते, किरकोळच असत.’ – माजी ४८३.
घाऊल न. नफा; फायदा; किफायत. पहा : गाऊल
घाए पु. घाव; घाय; वार : ‘तंव चैद्यु भणें हो हो राहे । माझा घाए साहे ॥’− शिव १०७१.
घाएखंडी स्त्री. घाव घालणे आणि पेलणे : ‘एकु : घाएखंडी दाखविजो की :’ – लीचपू २९९.
घाएवटणे अक्रि. जखमी होणे; जखमेने जर्जर होणे. पहा : घायवटणे : ‘कटाक्षीं मन घाएवटें ।’ – शिव ६६६.
घाओसणे अक्रि. गवसणे; प्राप्त होणे : ‘प्रिये अव्हेरिले : धिंगतीचें ज्यालें : वियोग घाओसले : जन्मवेऱ्हीं :’ – अभंगपर्व.