शब्द समानार्थी व्याख्या
घेघेमार पु. १. निकराचा, नेटाचा, जोराचा एकत्रितपणे प्रयत्न, हल्ला; चोहोकडून अनेकांचा पराकाष्ठेचा प्रयत्न. २. (ल.) हातघाईची लढाई (कारण अशा वेळी घे, घे, मार, मार अशी वीरश्रीची भाषा चालू असते. ३. दाणादाण (क्रि. होणे).
घेघेमार क्रिवि. घाईने; उतावीळपणाने; मागेपुढे न पाहता; विचार न करता.
घेटा पु. बोकड; एडका; मेंढा : ‘शिकारी संबंधात प्राथमिक व्यवस्था करण्यासाठी पाठवलेल्या अमलदारांस पाडे, घेटे मिळवून देण्यासाठी…’ – सिंहाचे व वाघाचे शिकारीसंबंधी नियम. (बडोदे) [हिं. घे]
घेटाघेटी स्त्री. मुलांचा एक खेळ.
घेटी स्त्री. बकरी; कोकरू. [गु.]
घेटुळी स्त्री. (वै.) एक प्रकारची औषधी वनस्पती. हिला पुनर्नवा असे म्हणतात. पांढरी व काळी असे हिचे दोन प्रकार आहेत : ‘पोट फुगण्याची व्यथा असणारांनी घेटोळी किंवा खापरीची भाजी खावी.’ – निजी ५७.
घेटोळी स्त्री. (वै.) एक प्रकारची औषधी वनस्पती. हिला पुनर्नवा असे म्हणतात. पांढरी व काळी असे हिचे दोन प्रकार आहेत : ‘पोट फुगण्याची व्यथा असणारांनी घेटोळी किंवा खापरीची भाजी खावी.’ – निजी ५७.
घेटो पु. (राज्य.) १. शहराच्या ज्या भागात ज्यू लोकांना सक्तीने ठेवले जात असे तो भाग किंवा वस्ती. २. कोणत्याही वांशिक किंवा सांस्कृतिक अल्पसंख्याकांना सक्तीने वस्तीसाठी राखून ठेवलेला भाग. [इं.]
घेणी स्त्री. १. घेणे; ग्रहण करणे; स्वीकार : ‘अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं । कीजे जयाची घेणी ।’ – अमृ. ७·४२. २. (गंजिफांचा खेळ) दशावतारी गंजिफातील एक पारिभाषिक संज्ञा; ज्या गड्याकडे राजा असून वजीर नसेल त्याचा वजीरवाल्या इसमाकडून डाव घेण्याचा हक्क. ३. (लग्नांत) दुसऱ्या पक्षाकडून घ्यायची रक्कम, जिनसा इ.; करणी, हुंडा. [सं. ग्रह]
घेणे सक्रि. १. स्वीकारणे; प्रवेश देणे; अंगीकारणे; आपल्या हातात येईलसा करणे : ‘त्यात घेऊं ये तितुकें घ्यावे ।’ – दास १५·९·३२. २. धरणे; पकडणे; हिसकणे; झोंबाडणे : ‘जे घेय हातीं बरवी विपंची ।’ – सारुह १·२. ३. लागणे बसणे; मिळणे (मार इ.). ४. समाविष्ट, प्रविष्ट, अंतर्भूत करणे; आत येऊ देणे. ५. कवटाळणे; कैवार घेणे; पत्करणे; उचलणे (पक्ष, बाजू, धर्म इ.). ६. कबूल, मान्य करणे; मान्यता, संमती, अनुमोदन देणे; ग्राह्य समजणे. ७. योग्यता, किंमत जाणणे (गुणांची); आदरणे; चांगले लेखणे (गुणांबरोबर उपयोग). ८. हस्तगत करणे; मिळवणे; पैदा करणे; शोधून मिळवून आणणे; संपादन करणे (खबर, बातमी, चाहूल, पायरव). [सं. ग्रह], ९. समजणे; मानणे : ‘ये दुजे नाहींचि घेई । सर्वत्र मी गा ॥’ – ज्ञा १५·४११. १०. ऐकणे : ‘वाक्य घेऊनि हरुषली आई ।’ – दावि १६०. ११. मनात आणणे, बाळगणे, ठेवणे (शंका, संशय, तिरस्कार इ.) : ‘मागे हांसति गौळणी हरिपुढें ह्या घेतलीसे भ्रमें ।’ – आकृष्ण ३८. १२. आविर्भाव आणणे, पांघरणे; लटके धारण करणे (वेड, सोंग इ.). १३. मुकवणे; हरण करणे; नाश करणे; बुडविणे (प्राण, शील इ.). १४. छाटणे; तोडून टाकणे; कापणे. १५. लागणे; आवश्यकता असणे; खर्ची पाडणे; खपवणे; आटवणे; खाणे (वेळ, स्थळ, शक्ती). १६. खडकावणे; खडसणे; ठोक देणे; मारणे. १७. विशिष्ट आचरण, वर्तन, कृती करणे. उदा. शोध, वाद, गाठ, लढाई, माप घेणे. १८. हाताने देणे; उचलून देणे; जवळ नेणे. ह्या अर्थी नेहमी आज्ञार्थीचा प्रयोग होतो. १९. जोडणे; मिळविणे; स्वतःवर आणणे; ओढवून घेणे (उपहास, निंदा, मार); विषय होणे (निंदा, मार इ. चा). २०. पलीकडे जाणे; ओलांडणे (डोंगर, विशिष्ट स्थिती); संपविणे; शेवटास नेणे; सिद्धीस नेणे (प्रवास, मजल इ.). २१. जोडणे; सामील करणे; वाढविणे. २२. स्वतःला जोडणे; जडवून घेणे; लावून घेणे (सवय, खोड, व्यसन). २३. आणणे; घालणे; माथी मारणे; अंगाला चिकटविणे (आरोप, आळ, बालंट, तुफान). २४. (एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूचा स्वतःवर) परिणाम होऊ देणे; विकार पावणे; परिणाम लागू करून घेणे. २५. जवळ येऊ देणे, पाजणे. (गाईने वासराला), २६. मारणे; बळी घेणे; नाश करणे. २७. स्थापणे; ठेवणे; आदराने स्पर्श करणे : ‘येऊनि तुजजवळीं । चरण घेतिल तव भाळीं ।’ – रत्न १७. २८. (बुद्धिबळांचा खेळ) एकाने दुसऱ्याचे मोहरे मारणे. कित्येक वेळी क्रियापदाच्या पुढे घेणे याचे रूप मनसोक्तपणे लावतात. अशा ठिकाणी ते कारक हा क्रियेचा कर्ता आहे असे दाखविते; तर काही ठिकाणी शब्दावर जोर देण्याकरिता त्याचा उपयोग करतात. विशेषतः कर्त्याविषयी जोराने बोलायचे असल्यास क्रियापदाला जोडून घेणे याचा प्रयोग करतात. परंतु सामान्यतः अशा वाक्यरचनेने विशेष अर्थ ध्वनित होत नाही व वाक्य चांगल्या रीतीने पुरे करण्यातच केवळ याचा उपयोग करतात. जसे : – पोराने हात पोळून घेतला. काही वेळा एखादी क्रिया आटोपून, उरकून टाकणे या अर्थी पूर्वकालवाचक धातुसाधितास घेणे हा शब्द जोडतात. उदा. स्नान करून घ्या, मी भात शिजवून घेतो, हे तुम्ही मनावर घ्या. इ. २९. (घेणे ह्या क्रियापदाचे निरनिराळ्या संबंधात अनेक प्रयोग होतात. उत्पादन–घर–चालीवर–जागा–शेवट–तोंडीवर–त्वरेवर–घाव–परीक्षा–पाठ–रान इ. अनेक शब्दांना जोडून घेणे या क्रियापदाचा होतो. त्याचप्रमाणे देणे, टाकणे, मारणे, घालणे व पाडणे या धातूंप्रमाणे अनेक धातुसाधितांना जोडूनही घेणे शब्दाचा प्रयोग करतात. उदा. आटोपता घेणे, आखडता घेणे, काढता घेणे. श्वास, रजा, सूड इ. शब्दांना जोडूनही घेणे या क्रियापदाचा उपयोग होतो. शिवाय उपयोग करणे, गिळणे, सहन करणे, सोसणे (रोग, व्यसन इ.) जडवून घेणे इ. अनेक अर्थ होतात.
घेणे अक्रि. १. जाणे; पळून जाणे; एखाद्याचा आश्रय करणे. २. वळणे; कल होणे; एखादी गोष्ट करायला तयार होणे (मन इ. नी) : ‘त्यामुळें ह्याचा शब्दशः अर्थ करण्यास मन घेत नाहीं.’ – मसाप. २·११७. ३. (भय, रोग, मोह इ. कांच्या) ताब्यात जाणे; (ज्वर, भय मोह, दुखणे इ. कांनी) घेरले जाणे; व्यथित होणे : ‘आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवें ।’ – ज्ञा ९·१७.
घेणे न. १. लूट : ‘… तह केला कीं जे घेणे येईल. त्यात पायींच्याचा येक विभाग व स्वारांचे दोन विभाग.’ – पे ३३·१३२. २. उसनी दिलेली, परत यायची रक्कम, प्राप्ती, पहा : घेणे देणे
घेणेकरी वि. १. सावकार; धनको; कर्जदार. २. काही काम न करता पोटभर खाण्यास मिळण्याचा हक्क सांगणारा (नातलग, आजारी नोकर).
घेणेदार वि. १. सावकार; धनको; कर्जदार. २. काही काम न करता पोटभर खाण्यास मिळण्याचा हक्क सांगणारा (नातलग, आजारी नोकर).
घे–दे स्त्री. १. अटी तटीचे भांडण; हातघाई : ‘ऐसी घे–दे होताए ।’ – लीचउ १२६·२. २. शाब्दिक झटापट : ‘पंडित केसोबास… सकाळींचि घे–दे म्हणौनि थोरें जिज्ञासा करी होते.’ – स्मृस्थ. १२४.
घेणेदेणे न. १. उसने देणे व घेणे; देवघेव; परस्पर व्यवहार (एखाद्याशी करण्याचा) : ‘मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं । मंदावो लागली ॥’ – ज्ञा १६·१२. २. व्यापार; दळणवळण; उदीम.
घेतणे सक्रि. स्वीकारणे; पत्करणे. [सं. ग्रह्]
घेता वि. घेणारा : ‘जे मुकुटचि वृथा नटति घेते ।’ – मोआश्रम ४·२४.
घेधा वि. घेणारा : ‘जे मुकुटचि वृथा नटति घेते ।’ – मोआश्रम ४·२४.
घेतादेता वि. १. नेहमी पैसे उसनवार, कर्जाऊ घेऊन वेळच्या वेळी फेडणारा; कर्जाच्या बाबतीत चोख व्यवहार करणारा; नेहमीचे गिऱ्हाईक. २. (यावरून) शेजारधर्माचे दळणवळण ठेवण्याचा स्वभाव असणारा.
घेतादेता क्रिवि. (व्यापारात) शेवटी नक्की ठरवण्याच्या वेळी; देवघेवीच्या रदबदलीच्या शेवटी; प्रत्यक्ष देवघेवीच्या वेळी; किंमत ठरवून खरेदी करायच्या वेळी.
घेतावणा वि. घेण्याकडेच प्रवृत्ती असलेला.
घेते न. अंतःकरण.
घेपणे सक्रि. (कर्मणी) घेणे; ग्रहण करणे : ‘तंव आपुलिये पळीं हात । घेपतिही ।’ – अमृ २·१८. [सं. गृभ्]
घेपणे अक्रि. घेतले, ग्रासले जाणे; वेढले जाणे : ‘तो कामनामात्रें न घेपे ।’ – ज्ञा ३·७१.