शब्द समानार्थी व्याख्या
घोणसे पडवळ   आखूड पडवळाची एक जात.
घोणा पु. १. नाक : ‘येता तल्पसमीप कांत ललना ते वक्र घोणा करी ।’ – विरस १७. २. दोन्ही नाकपुड्यांमधील मांसल पडदा; घुळणा; घोळणा; घुणाघुणा [सं. घ्राण.] (वा.) घोणा फुटणे – उन्हामुळे, उष्णतेमुळे नाकातून रक्त वाहू लागले. ३. लाकूड कोरणारा किडा. (राजा.) [सं. घुण्]
घोणाटणे सक्रि. मोठ्याने ओरडून, ओरडाओरड करून (गुरे, हरिण, सावज इ.) एके ठिकाणी हाकून आणणे, हाकणे.
घोणाटणे अक्रि. १. (माशा, भुंगे इ.) घों घों करीत एकत्र जमणे. २. डरकाळ्या फोडीत, हंबरत हंबरत एकत्र होणे, जमणे (गुरे इ.). ३. कासावीस होणे; घायाळ होणे. (राजा. कु.) [सं. घु]
घोणाटा पु. १. (माशा इ.) घोंघावत एकत्र जमणे; घोंघावणे. २. (काम, वस्तू, व्यवहार इ. चा) गोंधळ, गुंतागुंत, घोटाळा, अव्यवस्थितपणा.
घोण्या पु. १. पाख्यांचा सांधा; घोणवसा. २. घोणवाशावर, पाटिसावर घालतात ते नळे.
घोन पु. मान. (झाडी) [सं. घोण]
घोन न. नाक. (व.) [सं. घ्राण]
घोनता पु. घोंगता; अंगरखा : ‘बंधू माझा नेणता । त्याला शिवला घोनता ।’ – घाश्रलो ७३. (घा.)
घोनसी स्त्री. चांदीचा हार. (झाडी)
घोनारणे सक्रि. खाली पडणे; लोळविणे : ‘मी अहंकाराते घोनारीं ।’ – उगी २५.
घोन्याड स्त्री. बलिप्रतिपदेला बलिराजा बनविण्याचे गवत. (झाडी)
घोप पु. झुबका; गुच्छा; घड; घोस. (को.)
घोपड पु. (प्रां.) मोठे, खुजे व पसरट असे अळंबे, कुत्र्याचे मूत.
घोपाण स्त्री. मर्दपणा; ताकद; शक्ती. (कु.)
घोवार न. भ्रम.
घोबे न. १. अकल्पित रीतीने झालेला मोठा लाभ; घबाड; घबूक. (क्रि. येणे, मिळणे, सापडणे, हाताला लागणे.) २. (व्यापार इत्यादिकांत) सट्टयाने झालेला फायदा. ३. अल्पप्रयासाने संसाराचा निर्वाह होण्याइतके द्रव, धान्य इ. देणारा यजमान किंवा शेत.
घोय पु. पदर; घोळ (व.).
घोयटीक स्त्री. सराव; अभ्यास; घसरट. (गो.)
घोयरा पु. सरड्याच्या जातीचा एक प्राणी.
घोयेल स्त्री. घोरपड. (झाडी)
घोर पु. १. वीणा इ. वाद्यांतील खर्ज स्वराची तार; (वाद्यातील) खर्ज स्वर. २. झोपेतले घोरणे. ३. मृत्यूसमयी होणारा घशातील घरघर असा आवाज : ‘हा वेदार्थ सागरू । जया निद्रिताचा घोरू । तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ॥’ – ज्ञा १·७२. ४. काळजी; धोसरा; मानसिक अस्वस्थता; चिंता. (क्रि. पडणे, घेणे, करणे, लागणे.) : ‘त्याचा नित्याचा घोर नाहींसा होऊन त्याची स्वभाववृत्ति प्रबळ झाली.’ – नि ७०३. ५. अन्य स्थळी गेलेल्या माणसाबद्दल घेतलेली खंत, घोकणी. (क्रि. घेणे.), ६. हल्ला; विध्वंस : ‘केली मखीं घोर निशाचरांनी ।’ – अविश्वा २०. ७. आक्रोश; आकान्त; रडारड; कोलाहल. ८. आरडाओरडा; गलबला; गिल्ला; गलका; गोंगाट; कल्ला (क्रि. करणे). ९. संकट : ‘मान अपमानाचे पडिले । भ्रांतीचे घोरीं ।’ – दावि २६०. (वा.) घोर करणे – राग; वैषम्य मानणे; गवगवा करणे : ‘त्यांच्या पालख्याचा रोजमरा आपण वजा केला त्यामुळें त्यांनीं फारच घोर केला आहे.’ – पेद भाग २० २२९. घोरात पडणे – संकटात पडणे, सापडणे. १०. साहस; धाडसी कृत्य : ‘कैकईनं केला घोर । रथ घेतला हातावर ।’ – जसा २०६. [सं.], ११. पैंजण. (झाडी)
घोर वि. १. भयंकर; अघोर; भयप्रद; भयानक; क्रूर; विक्राळ (मुद्रा, आवाज, काम, घडणाऱ्या गोष्टी). २. निबिड; दाट; घनदाट; गाढ; भयाण (अंधार, अरण्य इ.) : ‘मी राजाच्या सदनि अथवा घोर रानीं शिरेन ।’ – खरे, जन्मभूमि. ३. घनघोर; तुंबळ; हातघाईचे; निकराचे (युद्ध, लढाई इ.) : ‘कलह उत्पादी अतिघोर ।’ – एभा १·२०४. ४. गाढ, घनघोर (निद्रा). ५. अचाट; अवाढव्य; (इमारत). ६. अफाट (भरलेली नदी). [सं.]
घोरकंड पु. आरारूटची एक जात.
घोरचा पु. जाच, जुलूम : ‘आता सुलतानीचा तर घोरचा नाही.’ – जोफु ११२.