शब्द समानार्थी व्याख्या
घोरड न. सुस्त, गैदी, नेभळा, अव्यवस्थित, झोपाळू अशा माणसाला तिरस्काराने लावायचा शब्द. (राजा.)
घोरड वि. १. योग्य प्रकारे न घोळलेले (मणी). २. न भाजलेले (चणे). (झाडी) [सं. घुर्णा]
घोरडदेव पु. १. सर्व पदार्थांच्या शिजलेल्या मिश्रणाचा नैवेद्य ज्याला लागतो असे दैवत. २. (ल.) अनेक पदार्थांचे मिश्रण; खिचडी. (व.)
घोरणे अक्रि. झोपेत श्वासोच्छ्‌वासावेळी घर्र घर्र असा आवाज होणे. [सं. घुर्]
घोरन पु. भाजी घट्ट व्हावी म्हणून लावावयाचे पीठ.
घोरनी स्त्री. १. रवी, घोळणी. २. मणी घोळण्याचे साधन. (झाडी)
घोरपड स्त्री. १. सरड्याच्या जातीचा एक मोठा सरपटणारा प्राणी. हिला उष्ण व ओलाव्याची हवा लागते. हिची चरबी औषधी आहे. ही आपल्या नख्यांनी खडकाला अतिशय घट्ट धरू शकते. २. (ल.) लचांड; लिगाड; त्रासदायक काम, मनुष्य : ‘ही घोरपड विश्वामित्राच्या गळ्यांत पडली.’ – नाकु ३·९४. ३. (ल.) अरिष्ट; मोठे संकट; आळ; तुफान : ‘बाळकृष्णपंतावर कोणती घोरपड येणार हे पाहण्याकरितां टपून आहोत.’ – विक्षिप्त १·३७. (वा.) एखाद्यावर घोरपड आणणे – एखाद्याला गोत्यात आणणे, संकटात आणणे. एखाद्यावर घोरपड येणे – संकटात, पेचात, अडचणीत सापडणे. घोरपड गळ्यात पडणे – न आवडणारी गोष्ट, बायको स्वीकारावी लागणे : ‘ह्या जातीय निवाड्याची ही घोरपड जी एकदा भारतीय राजकारणाच्या गळ्यात पडली.’ – निप्र ५. घोरपड गळ्यात बांधणे – नको असलेल्या, न आवडणाऱ्या, कुरुप स्त्रीशी लग्न लावून देणे.
घोरपळी स्त्री. एक प्रकारचा रोग. (खा.)
घोबे न. किफायत शीर सौदा.
घोरबंद पु. खोगिराचा पुढचा बंद. पहा : गोरबंद
घोरमार पु. भयंकर आवाज.
घोरवाणी वि. अमंगल वाणी.
घोरवेळ स्त्री. (ज्यो.) १. अशुभ, अनिष्ट, भयसूचक वेळ. २. (अनिष्टतेच्या ध्वनितार्थावरून) करकरीत तिन्हीसांजा; टळटळीत मध्यान्ह.
घोरंकार पु. अव. (एखाद्या कार्याबद्दलचा) पराकाष्ठेचा प्रयत्न; खटाटोप; नेटाचा, आवेशाचा यत्न; अनेक प्रकारची उलाढाल; साहस, हिकमत.
घोरंदर वि. १. भयंकर : तुंबळ, घनघोर, निकराचे (युद्ध) ‘झोटी धरूनि पाडिती अपार । घोरांदर मांडिलें ।’ – एरुस्व ८·४४; ‘युद्ध मांडिलें घोरंदर ।’ – मुआदि १३·१२. [सं. घोरतर], २. गाढ; घोर : ‘निद्रा आली घोरंदरी ।’ – क्रिपु २·३४·४.
घोरांदर वि. भयंकर : तुंबळ, घनघोर, निकराचे (युद्ध) ‘झोटी धरूनि पाडिती अपार । घोरांदर मांडिलें ।’ – एरुस्व ८·४४; ‘युद्ध मांडिलें घोरंदर ।’ – मुआदि १३·१२. [सं. घोरतर]
घोरासुरांचे आख्यान   (उप.) डाराडूर झोप; घोर झोप : ‘घालून ठेवलेले अंथरुण पायानंच उलगडून ही अश्शी घोरासुराच्या अख्यानाला सुरवात…’ – फाटक नाट्यछटा २.
घोरांटी स्त्री. (प्रां.) मरणसमयी लागणारी घरघर; घोर.
घोरांधर   पहा : घोरांदर : ‘अमरां असुरांसारिखे घोर । युद्ध माजले घोरांधर ।’ मुआदि २३·१२७.
घोरांधर न. संकट : ‘जो होय निर्धारें रक्षेताः घोरांधरापासौनि – ऋम ४०८.’
घोरिवडा पु. गौळवाडा (को.)
घोरेणी स्त्री. घोरणे; घरघर. (गो.)
घोरोप पु. मगज. (गो.)
घोल पु. १. दोन डोंगरामधील खिंड; दरी; खोल खिंडार. (को.), २. एक वाद्य : ‘सुसंद ताल घोल वात’ – उह ८४.
घोल न. गर्द झाडी असणारी राई. (कु.)