शब्द समानार्थी व्याख्या
घोवकी स्त्री. पुरुषत्व; मर्दपणा; पौरुष.
घोवगाडा पु. नवरा, दीर इ. सासरचे माणूस; पालनकर्ता माणूस.
घोवदी पु. पुरुष; बाप्या; गृहस्थ. (राजा.)
घोवबा पु. नायकिणीचा मुलगा. (गो.)
घोवसांडा दिवस   उन्हाळ्यातील दिवस. (कु.)
घोष पु. १. (मोती इत्यादिकांचा) घोस, झुबका : ‘मर्गजामणीचें घोषें । कमलकांति होति हसासें ।’ – शिव ४०९. २. गवळीवाडा; गवळ्यांची वस्ती : ‘गुरुसुत महेंद्र धनु घन शर ते जलवृष्टि सैन्य तो घोष ।’ – मोकर्ण १३·१२. [सं.], ३. (समुद्र, ढग, अध्ययन, पठण इत्यादिकांचा) एकसारखा होणारा मोठा गंभीर आवाज; गर्जना; पुकारा, गजर : ‘ते जयजय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे ।’ – ज्ञा ११·३३६. ४. परा वाचा; परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चार वाणींपैकी परा वाणी; यांनाच अनुक्रमे घोष, ध्वनी, नाद व आकार अशीही नावे आहेत : ‘पैं ब्रह्मबीजा जाहला अंकुरू । घोषध्वनीनादाकारू ।’ – ज्ञा ९·२७५. ५. घोकणे; पाठ करणे. ६. (आपला उद्देश, इच्छा इत्यादिकांचा) पुनः पुन्हा उच्चार करणे, सांगणे; एकाच गोष्टीचा निदिध्यास. पहा : घोकणी २. (क्रि. घेणे, लावणे, लागणे, मांडणे). [सं. घुष्], ७. स्वरनलिकांच्या कंपामुळे ध्वनीत येणारे एक वैशिष्ट्य. ‘क’ या ध्वनीत घोष नाही, ‘ग’ मध्ये आहे.
घोषक पु. कर्णा.
घोषण न. स्त्री. १. मोठ्याने बोलणे, वाजविणे, ऐकविणे. २. प्रसिद्ध करणे; जाहीर करणे; प्रसिद्धी. (क्रि. करणे.) (वा.) घोषण देणे, घोषणा देणे – सर्वांनी मिळून एकच ध्येयवाक्य, घोषवाक्य उच्च स्वरात म्हणणे किंवा जयजयकार करणे.
घोषणा न. स्त्री. १. मोठ्याने बोलणे, वाजविणे, ऐकविणे. २. प्रसिद्ध करणे; जाहीर करणे; प्रसिद्धी. (क्रि. करणे.) (वा.) घोषण देणे, घोषणा देणे – सर्वांनी मिळून एकच ध्येयवाक्य, घोषवाक्य उच्च स्वरात म्हणणे किंवा जयजयकार करणे.
घोषणापत्र न. जाहीर पत्रक; जाहीरनामा : ‘डॉ. भाभा यांनी विज्ञानविषयक भारतीय धोरणाचे एक घोषणापत्र तयार केले.’ – भाआशे ४२.
घोषमंदिर न. गोठा; गुरे बांधण्याची जागा : ‘तो राधेची सासू म्हातारी । तीही नसे कदा घरीं । सदा राहे घोषमंदिरीं । दधिमंथना कारणे ।’ – ह ८·५८.
घोषयात्रा स्त्री. गाई, म्हशी इ. पशूंचे अरण्यात चरणे, बागडणे इ. पाहण्याची क्रीडा. [सं.]
घोषा पु. गाजावाजा; कीर्ति : ‘याच्या किर्तीच्या घोषा दूर गेला ।’ – ऐपो १११.
घोषित न. सूचना; जाहिरात : ‘लाउडस्पीकरमधून निनादणारी ती घोषिते…’ – खर्डे ११८. (क्रि. करणे.)
घोषित वि. अधिकृतपणे प्रकट किंवा जाहीर केलेले.
घोस पु. १. मांस; सागुती : ‘अम्बा त्या बाईनें घोस गाईचा पाहिला.’ – ऐपो १·५८. [फा. गोश्त], २. (मोती, फुले इ. कांचा) गुच्छ; झुपका; तुरा; झुमका : ‘सन्मुख भेटला राजहंस । मुक्ताफळांचा घोंस मुखीं धरुनी ।’ – मारा बाल १२·२४. [सं. गुच्छ], ३. (नाविक) शिडाच्या पुढील (नाळीकडील) भाग; परबाणाचे नाळीजवळचे टोक. हे दुसऱ्या टोकापेक्षा जाड असते. शीड दोन्ही टोकांनी परबाणाला बांधलेले असते. हे केव्हाही डोलकाठीच्या मागे जात नाही. वाऱ्याच्या दिशांप्रमाणे शीड बांधण्याचा एक प्रकार व दमाण हा दुसरा प्रकार आहे. (को.) ४. शीड बांधण्याची दोरी. ५. वाऱ्याची दिशा. ६. गलबताने प्रवास करणे; विवक्षित स्थळी गलबताने केलेली फेरी; समुद्रावरील सफर. ७. (आवेश, उत्साह, ऐश्वर्य, वैभव इ. कांचा) प्रकर्ष; वैपुल्य; भर; जोस. [सं. घोष्] (वा.) घोसात असणे – ऐश्वर्यात दंग असणे, मनोराज्य करणे. भर घोसाने, घोसानिशी, भरल्या घोसाने – सर्व शक्ती एकवटून, नेटाने व छातीठोकपणे; भगीरथ प्रयत्नाने. ८. फडा.
घोस वि. मोठा; देखणा; पुरा; लठ्ठ व दिखाऊ; घवघवीत. [सं. गुच्छ़]
घोसणे सक्रि. १. शोधणे. २. गवसणे; सापडणे.
घोसदार वि. (मोत्यांचा) घोस असलेले (कर्णभूषण इ.); घोस लागलेला; घोसांनी युक्त; भरदार.
घोसफळ न. (वन.) एकाच फुलातील सुट्या किंजदलापासून बनलेल्या फळांचा झुबका.
घोसबाळी स्त्री. मोत्याचे घोस लावलेली कानात घालायची बाळी : ‘कोथिंबिरी, टांपण, घोंसबाळ्या ।’ – सारुह ६·२४; स्त्रियांचे कर्णभूषण.
घोसबाळे पु. अ. व. दागिन्यात बांधायचा लटकता लोलक, ताईत, करण.
घोसवाला पु. १. पैलूचा अगर बिनपैलूचा. २. टोकावर छिद्र असलेला, लांबट हिरा.
घोसळणे उक्रि. १. जमिनीवर लोळवणे, घोळसणे. २. ढोसळणे; धरून गदगदा हलविणे. (व.) ३. चांगले चोळणे.
घोसा पु. १. फुलांचा गजरा, गुच्छ. (को.), २. गोषा : ‘अजून घोसा राकून हाय घराणं ते ! शिर्क्यांच्या बाईचं नक नदरं पडायचं न्हाई !’ – भेटी ३.