शब्द समानार्थी व्याख्या
कूर्म पु. डोळ्यामधील तांबडा ठिपका. पहा : कुमरी [सं.]
कूर्मगति स्त्री. सावकाश चालणे; मंद चाल : ‘शिक्षणाची प्रगती कूर्मगतीने चालू आहे.’ - माप्र ४३३. [सं.]
कूर्मगती स्त्री. सावकाश चालणे; मंद चाल : ‘शिक्षणाची प्रगती कूर्मगतीने चालू आहे.’ - माप्र ४३३. [सं.]
कूर्मदुग्ध न. कासविणीचे दूध; असंभाव्य गोष्टी (ख - पुष्पाप्रमाणे). [सं.]
कूर्मदृष्टि स्त्री. कृपा; कृपादृष्टी; मेहेरबानी (कारण कासविणीस आचळे नसल्याने तिच्या नुसत्या मायेच्या दृष्टीनेच तिची पिले वाढतात.)
कूर्मदृष्टि वि. कृपादृष्टी दाखविणारा. [सं.]
कूर्मदृष्टि स्त्री. कृपा; कृपादृष्टी; मेहेरबानी (कारण कासविणीस आचळे नसल्याने तिच्या नुसत्या मायेच्या दृष्टीनेच तिची पिले वाढतात.)
कूर्मदृष्टि वि. कृपादृष्टी दाखविणारा. [सं.]
कूर्मपृष्ठाकार वि. बहिर्गोल (भिंग वगैरे). [सं.]
कूर्मलोम न. कासवाचे केस; अशक्य गोष्ट. [सं.]
कूर्मासन न. १. (योग) योगशास्त्रात सांगितलेले एक आसन. याचे चार प्रकार आहेत. २. (मल्लखांब) मल्लखांबावर आढी मारून हातांनी पायाचे अंगठे धरून केलेले आसन. [सं.]
कूल न. वंश; जात; देवक इ. अर्थी. पहा : कुल [सं. कुल]
कूल न. तीर; काठ : ‘श्रीगोदावरीच्या कूलीं ।’ - ज्ञा १८·१८०३. [सं.]
कूल न. सोनाराची घडणावळ : ‘दागिन्यांना चांगला घाट येऊ द्या हो. कुलीसाठी दोन रुपये जाजती पडले तरी चिंता नाही.’ - मासंवा १८५. (गो.) [क. कूलि]
कूल न. लाकडात भोक पाडून त्यात बसविण्यासाठी तयार केलेले लाकडाचे टोक, खुंटी, कुसू. [कर्ना.]
कूलर पु. (हवा, पाणी, वगैरे) थंड करणारे यंत्र. [इं.]
कूली सरोवर   (भूशा.) लाव्हा रसाच्या प्रवाहाने तयार झालेले सरोवर.
कूलोम न. विद्युतभाराचे परिमाण.
कूशार वि. स्वच्छ; मोकळे.
कूस स्त्री. १. शरीराची एक बाजू; बरगडीची, काखेखालची बाजू. २. जठर, गर्भाशय : ‘तो तू देवकीकूंसीचा सेजारीं ।’ - शिव ११२. ३. (ल.) जागा; अवकाश (खोटे बोलण्यास, फसवण्यास, लबाडीस, गैरमिळकतीस). (सामा.) जागा किंवा अवकाश असा अर्थ. ४. भरलेली जागा; साधलेली संधी (खोटे हिशेब करून खऱ्या खर्चापेक्षा जास्त रक्कम खर्ची टाकून, माल जमा करून, दुसऱ्याची व्यवस्था करताना काही रक्कम गिळंकृत करून इ.); घेतलेले माप किंवा केलेले हिशेब यात फारशी लबाडी अंगी न लागता थोडासा कमी - अधिकपणा करणे; थोडी कसर; वर्तावळा. ५. गुरे इ. प्रसवल्यानंतर त्यांच्या योनिद्वारे निघणारा कुजका अंश. [सं. कुक्षि.] (वा.) कूस उजवणे - मूल होणे. कूस घालणे - खेळातील नियम मोडल्याबद्दल खेळगड्‌याला बाहेर टाकणे. (कु.) कूस ठेवणे - सवलत देणे : ‘पण टिळकांपुरती त्यांनी सार्वजनिक सभेची कूस ठेवण्याची तयारी दाखवली.’ - आभासा २५७. कूस फावणे - संधी मिळणे.; सबब सापडणे : ‘ तिच्या योगाने मुसलमानांना आपल्या मागण्या वाढविण्याला कूस फावली.” - आभासे ३८१. कूस फुटप - पहा : कूस उजवणे (गो.) कूस भरणे - : एखाद्या पदार्थाने पोट भरणे. २. गर्भ राहणे. कुशीस होणे - एका अंगावर निजणे.
कूस न. १. कुसळ; टोक : ‘आपली लेखणी ते किती नम्रपणाने चालवितात व तिचे कूसहि कोणास बोचू नये या विषयी ते किती जपत असत.’ - निमा ९०९ २. (ल.) अशिष्ट शब्द. [सं. कुश]
कूस स्त्री. कामचुकारपणा : ‘खरी मेहनत व कूस किती याची खडान्‌खडा माहिती असल्यामुळे.’ - गांगा १४.
कूस   स्त्री. सोंड : ‘(भुंगा) अंगावर आदळून कूस मारायचा.’ - तीम १४३.
कूसगोम स्त्री. घोड्याच्या कुशीवर असलेली गोम, भोवरा. हा अशुभ मानतात.
कूसभोवरा स्त्री. घोड्याच्या कुशीवर असलेली गोम, भोवरा. हा अशुभ मानतात.