शब्द समानार्थी व्याख्या
कोईल स्त्री. भिंगरी; हाताने फिरवायचा भोवरा.
कोइंडा पु. चाबकाचा लाकडी दांडा, मूठ. पहा : कोयंडा (माण.)
कोई स्त्री. १. आंब्याची बी; बाठी. पहा : कोय, २. कोबीची भाजी. ३. कमळ.
कोईकमळ न. पांढरे कमळ.
कोई कोई   भीतीने फोडलेली किंकाळी; कुईकुई (क्रि. करणे, होणे). [ध्व.]
कोईट न. शाकारणीचे गवत. पहा : कुईट (को.)
कोईन स्त्री. नदीच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी बांबू, टाळे, दगड यांचा बांध घालून त्याला लावलेल्या टोपल्या. पहा : खोईण
कोईल स्त्री. विटीदांडू खेळताना जमिनीत खणतात ती खळगी; गल; गल्ली. (को.)
कोईलडाव पु. विटी मारण्याची पाळी; कोलण्याची पाळी.
कोकशात्र न. कामशास्त्र; रतिरहस्यशास्त्र. हा ग्रंथ कोक नावाच्या कवीने केल्यामुळे या ग्रंथाला कोकशास्त्र हे नाव पडले.
कोक पु. १. चक्रवाक पक्षी : ‘मी कोक झालों निका ।’ -आसेतु २६. [सं.], २. लड्डा (तोबा) चा खेळ; वर्तुळाकार बसलेल्या गड्यांच्या मागे नकळत लड्ड ठेवून खेळतात तो खेळ. (बे.) [ध्व.], ३. दगडी कोळशातील धूर उष्णता देऊन काढून टाकल्यावर राहणारा भाग. [इं.]
कोक न. १. कामशास्त्र; रतिरहस्यशास्त्र. हा ग्रंथ कोक नावाच्या कवीने केल्यामुळे या ग्रंथाला कोकशास्त्र हे नाव पडले. २. भोक; छिद्र; बीळ; (ना.) ३. खोक; जखम. (गो.), ४. कुबडा. ५. कुबड; पोक. ६. (ल.) फुगीर उंचवटा; फुगा : ‘बुचड्याचा आधीं झोंक, त्यामधीं ठेवी कोक नोक, झोकें भर पुरली’ - प्रला १११ [क. कोक्किकोकुं]
कोकटहोळी स्त्री. होळीच्या आदल्या दिवशीची खेळातील होळी.
कोकड स्त्री. न. पहा : खोकड
कोंकड स्त्री. न. पहा : खोकड
कोकड वि. वाकडा; वाकलेला; कुबडा. (व.)
कोकण न. महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनाऱ्यालगतचा भाग; सह्याद्रीच्या पश्चिमेकडील प्रदेश. (वा.) बैल कोकणात जाणे - १. शक्तिहीन होणे. २. वयपरत्वे दुर्बल, अशक्त होणे. ३. नपुंसक होणे. [सं. कोंकण]
कोकणघार स्त्री. करकोची पक्षीण.
कोकणदुधी पु. दुध्या भोपळा. (गो.)
कोकणपट्टी स्त्री. कोकणकिनारा. पहा : कोकण
कोकणस्थी वि. १. चित्पावन ब्राह्मण जातीसंबंधी; कोकणस्थांचा (बेत, व्यवहार, कारभार इ.). २. (ल.) काटकसरीचा; बेतास बात; कंजूषपणाचा; चिक्कूपणाचा.
कोकणा पु. खानदेशात व नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला ज्यांची वस्ती आहे अशी एक जात व त्या जातीचा मनुष्य.
कोकणी पु. खानदेशात व नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला ज्यांची वस्ती आहे अशी एक जात व त्या जातीचा मनुष्य.
कोकणी वि. १. कोकणसंबंधी. २. कोकणचा राहणारा.
कोकण्या वि. १. कोकणसंबंधी. २. कोकणचा राहणारा.