शब्द समानार्थी व्याख्या
कृतार्थ वि. उप. कृतकृत्य; ज्याने आपला हेतू साध्य केला आहे असा; ज्याला काही करायचे उरले नाही असा; तृप्त.
कृतक वि. (उंदीर, ससा, खार इत्यादीप्रमाणे) कुरतडणारा.
कृतक वि. मानलेला; दिखाऊ; नाटकी; लटका. [सं.]
कृतकपुत्र पु. (कायदा) मानलेला, पाळलेला मुलगा; विकत घेतलेला मुलगा. [सं.]
कृतकर्मा वि. निपुण; कुशल; हुशार. [सं.]
कृतकार्य वि. ज्याने आपले काम संपविले आहे असा; यशस्वी; विजयी; कृतार्थ; प्राप्तयश. पहा : कृतकृत्य [सं.]
कृतकाल वि. १. निश्चित, ठरावीक काळाचा; मुदतीचा; मुदतबंद (गहाण, निक्षेप यांच्या संबंधाने.). २. अमुक मुदतीपर्यंत चाकरी करायला जो आपणास बांधून घेतो असा (चाकर). [सं.]
कृतकृत्य वि. १. कृतकार्य; ज्याने संसारासंबंधी सर्व कृत्ये पार पाडून त्यापासून मिळणारे सुख अनुभवले आहे असा; पुण्यकृत्याने ज्याचा जन्म सार्थकी लागला आहे असा. २. आरंभिलेले दुर्घट काम ज्याने तडीला नेऊन समाधान प्राप्त करून घेतले आहे असा; ज्याला आपल्या श्रमाचे फळ मिळाले आहे असा : ‘म्हणे कृतकृत्य झालों देवदर्शनें ।’ - संवि २६·२८.
कृतकृत्य न. अशक्य, अपूर्व कृत्य; अगदी अचाट कृत्य; मोठ्या बुद्धिमत्तेचे काम.
कृतकृत्यता स्त्री. कृतार्थपणा; यशस्वितेचा अभिमान : ‘त्याच्यात सुस्ती, कृतकृत्यताबुद्धी, पंडितमन्यता वगैरे दोष अखंड बसल्यामुळे....’ - निमा ३. [सं.]
कृतघटस्फोट वि. घटस्फोट करून जातीबाहेर टाकलेला. [सं.]
कृतघ्न वि. १. निमकहराम; उपकार न जाणणारा; बेइमान; हरामखोर. २. केलेली कृत्ये किंवा उपाय व्यर्थ पाडणारा; कार्यविध्वंसक. [सं.]
कृतघ्नता स्त्री उपकाराची जाणीव नसणे; निमकहरामी; बेइमानी.
कृतनिश्चय पु. दृढनिश्चय, निग्रह, निर्धार.
कृतनिश्चय वि. दृढनिश्चयी; ज्याने निश्चय केला आहे असा. [सं.]
कृतसंकल्प पु. दृढनिश्चय, निग्रह, निर्धार.
कृतसंकल्प वि. दृढनिश्चयी; ज्याने निश्चय केला आहे असा. [सं.]
कृतपुंख वि. १. सोडला जाण्याच्या बेतात असलेला (बाण). २. (ल.) निघण्याच्या बेतात आहे असा. [सं.]
कृतबुद्धी वि. निश्चयी : ‘ऐसे हट निग्रही कृतबुद्धी ।’ - दास १·१०·११. [सं.]
कृतयुग न. पहा : कृत
कृतसंस्कार वि. जो संस्काराने पावन झालेला आहे किंवा ज्याच्यावर विशेष संस्कार झाला आहे असा. [सं.]
कृतसाक्षी पु. (कायदा) साक्ष देण्याकरिता नेमलेला. पहा : साक्षी [सं.]
कृतज्ञ वि. उपकार जाणणारा; निमक-नमकहलाल; इमानी. [सं.]
कृतज्ञता स्त्री. उपकाराची जाणीव. [सं.]
कृताकृत वि. १. बेपर्वा; उदासीन; आवश्यकही नव्हे व अयोग्यही नव्हे असा (केल्या तरी चालतील, न केल्या तरी चालतील अशा गोष्टीसंबंधी); वैकल्पिक. २. निष्काळजीपणाने, अनास्थेने केलेले किंवा अजिबात गाळलेले; अर्धवट; अपूर्ण.