शब्द समानार्थी व्याख्या
कोडी स्त्री. १. विसांची संख्या; खंडी (कापड, लोखंडी पत्रे, बांगड्या इ. मोजताना योजितात) : ‘इंगरेजी तरवारा उत्तम कोडी’ - पेद ८·५२. २. कोटी; शंभर लक्ष : ‘जे वर्षशतांचिया कोडी ।’ - ज्ञा ६·४६५. पहा : कोटि ३. अनेक पंक्ती : ‘आनंदें डोलति कोडी । विमानाचिया ।’ - ऋ ३६. ४. प्रकार; तऱ्हा : ‘कोडीअे असंख्यातु कळसु । जेथें मिर्वती गगना ।’ - धवळे १५. [सं. कोटी], ५. (भूमिती) उंची; खोली. [सं. कोटी]
कोडी वि. रक्तपित्या; कोड झालेला; महारोगी. [सं. कुष्ठ]
कोडीमोडी स्त्री. खोडीमोडी; अवयव आखडणे : ‘ते... वाये कोडीमोडी करूनि घातले असति’ - लीचपू ४३९.
कोडुळे न. कडबुळे. पहा : कोडबोळे (व.)
कडुवळे न. कडबुळे. पहा : कोडबोळे (व.)
कोडू पु. कात. (बे.)
कोडू स्त्री. चिरीमिरी; वानगी. (गो.)
कोडे न. १. अडचण; कोंडमारा; पेच; संकट : ‘कोडें सांकडें संकट । नाना संसार खटपट ।’ - दास ४·३·६. २. कूटस्थळ; गूढ प्रश्न; सांकेतिक भाषेतील प्रश्न; उखाणा : ‘आजि फिटले माझें कोडें ।’ - तुगा २२४०. ३. कुवेडे; करणी; जादूटोणा. ४. रहस्य; न कळणारी गोष्ट : ‘कृष्णाताई हे एक कोडं होतं.’ - रथ २३१. [सं. कूट] कोडे करणे - दुसऱ्यावर भुतेखेते वगैरेसारख्या वाममार्गाने अभिचार करणे : ‘...तेव्हा शिंद्यांकडील लोक कांही कोडें केलें म्हणून आळ घेऊन कटकटीस आले.’ - ऐलेसं ५१२८. कोडे घालणे - कठीण प्रश्न विचारणे; अडचणीत टाकणे. कोडे पडणे - काय करावे हे न सुचणे; अडचणीत सापडणे. कोड्यात टाकणे - काय करावे ते दुसऱ्याला न सुचेल असे करणे : ‘विरुबाईनी त्यांना कोड्यात टाकलं होतं.’ - राऊ ३३४. कोड्यात पडणे - काय करावे ते न सुचणे; प्रश्न पडणे. ५. प्रेम. ६. पणती (मातीची); दिवे लावणे. ७. डाक लावण्याच्या वेळी उपयोगात आणायचा समईवजा दिवा. [सं. कूट = मडके]
कोडेल वि. कोड आल्यासारखे अधूनमधून, तुटकतुटक, एकसारखे नसणारे. (व.)
कोडेवर्म न. कपट वृत्ती; कूट कर्म : ‘कासया करावें कोडेंवर्म । सत्यधर्म लपवूनी ।’ - भवि १४·१४.
कोडोळे न. १. पातेल्यात किंवा कढईत केलेले थालीपीठ (भाजणीचे). २. पहा : कोंडाळे
कोंडोळे न. १. पातेल्यात किंवा कढईत केलेले थालीपीठ (भाजणीचे). २. पहा : कोंडाळे
कोड्या वि. कुष्ठरोगी; महारोगी : ‘जैसा कोढी आपुला हाती । वारंवार लक्षित ।’ - मुरंशु २६०. [सं. कुष्ठ]
कोढ्या वि. कुष्ठरोगी; महारोगी : ‘जैसा कोढी आपुला हाती । वारंवार लक्षित ।’ - मुरंशु २६०. [सं. कुष्ठ]
कोढी वि. कुष्ठरोगी; महारोगी : ‘जैसा कोढी आपुला हाती । वारंवार लक्षित ।’ - मुरंशु २६०. [सं. कुष्ठ]
कोढळे न. भांडे : ‘बाइसीं : कोढळे पाहिलें :’ - लीचउ ६.
कोढी वि. हट्टी; दुराग्रही. (ना.) (वा) कोढी पडणे - कोंडी होणे; कोंडमारा होणे : ‘यामुळे संस्थानासी कोढी पडोन कांही ताखद नाहीसारखी झाली.’ - पेद २८·२०४.
कोढले   पहा : कोंढाळे : ‘कोढुले आणिलें : तवं तेल नाही’ - लीचउ ८.
कोण सना. १. प्रश्नार्थक सर्वनाम. अज्ञात माणसासंबंधाने विचारताना योजतात. २. कोणती; किती : ‘तेथें या कांबिटाचा गरिब गुण किती? प्रौढिही कोण येणें?’ - आसी ३२. ३. किती तरी; फार; अतोनात. ४. काय. [सं. कः पुनः]
कोण पु. १. कोपरी; कोन : ‘तुझ्या स्वरूपाच्या निजस्थानीं आकाश लोपलें एके कोणी ।’ - भारा बाल ११·१७० [सं.], २. प्रसूती : ‘रुक्मिणीसी जाला कोणु । जन्म पावला मदनु’ - उह ३७२. ३. मुलगा : ‘तेही आपुलेया कोणातें (लेकाते) गोसावीयांते पाहावेया पाठवीले :’ - लीचउ २९९. (वा.) कोणी नीगणे - बाळंत होणे : ‘तवं तीए कोणीं नीगाली’ - लीचउ २०२. ४. (ज्यो.) लग्न, पंचम व नवम स्थान. [सं.]
कोणटा पु. कोपरी; कोन : ‘तुझ्या स्वरूपाच्या निजस्थानीं आकाश लोपलें एके कोणी ।’ - भारा बाल ११·१७० [सं.]
कोन पु. प्रसूती : ‘रुक्मिणीसी जाला कोणु । जन्म पावला मदनु’ - उह ३७२. २. मुलगा : ‘तेही आपुलेया कोणातें (लेकाते) गोसावीयांते पाहावेया पाठवीले :’ - लीचउ २९९. (वा.) कोणी नीगणे - बाळंत होणे : ‘तवं तीए कोणीं नीगाली’ - लीचउ २०२.
कोनी पु. प्रसूती : ‘रुक्मिणीसी जाला कोणु । जन्म पावला मदनु’ - उह ३७२. २. मुलगा : ‘तेही आपुलेया कोणातें (लेकाते) गोसावीयांते पाहावेया पाठवीले :’ - लीचउ २९९. (वा.) कोणी नीगणे - बाळंत होणे : ‘तवं तीए कोणीं नीगाली’ - लीचउ २०२.
कोणएक सना. १. कोणीतरी एक. २. विशिष्ट किंवा एखादा माहीत असलेला मनुष्य, वस्तू.
कोणकोणटे अ. कोपऱ्याकोपऱ्यातून : ‘कोणकोणटें चौक झाडिला’ - गोप्र १९३.