शब्द समानार्थी व्याख्या
कोयाळ स्त्री. १. कोयीचे केलेले वाद्य; पुंगी; पिपाणी. २. आंब्याच्या कोयीची भिंगरी; कोकाटी.
कोयाळ वि. १. कोय अथवा बाठा धरलेला आंबा. २. मंजूळ : ‘पाटच्या पारामंदी कर्णा वाजतो कोयाळ.’ - जसा ४६१.
कोयाळणे अक्रि. (आंब्याने) बाठा धरणे; आंबा कोयीने युक्त होणे. (को.)
कोयी स्त्री. डोक्यातील केर काढण्यासाठी आंब्याच्या कोयीला दाते पाडून केली जाणारी फणी.
कोर स्त्री. पु. १. कडा; धार; कडेची रेषा; किनारा; पदार्थाच्या कडेचा सूक्ष्म व एकसारखा धाराकार अवयव; मर्यादा. २. (वस्त्राचा) काठ; काठाची पट्टी; (जरीची) किनार; फीत इ. ३. (भाकरी-पोळीचा) तुकडा, चतकोर (चंद्रकोरेप्रमाणे चतकोराला कड असते यावरून). ४. नखाच्या मुळाशी असलेल्या चंद्राच्या कोरीसारख्या रेषा व तेथे होणारे नखुरडे. ५. (शिंपी) काखेत लावण्याचा त्रिकोनी तुकडा; ठुशी. ६. हजामतीचा एक प्रकार. ७. हद्द; मर्यादा : ‘तैसे जी न बडबडी । पदाची कोर न सांडी ।’ - ज्ञा १२·८५४. ८. गोवरीचा तुकडा; गोवरी; शेणी. (वा.) [क. कोरू = भाग] कोर धरणे - कपाळावरील केस चंद्राच्या कोरीप्रमाणे ठेवणे, राखणे; तशी हजामत करणे.
कोर स्त्री. १. मत्सर; द्वेष; बरकस. [फा. कुऱ्हा] (वा.) कोर धरणे, लावणे - द्वेष करणे : ‘मानकऱ्याने कोर धरली ।’ - ऐपो २८७. कोर चालविणे - वैर धरणे : ‘परंतु हिसायेब मोहिद्दीनखानासी पठाणानी थोडेंच दिवसांत कोर चालवून दक्षण आपण आटोपावी या तलाशास लागले.’ - हिंदखं १·४२. २. शिपायांची तुकडी, रांग. [इं. कोअर]
कोरक न. एक भाजी.
कोरका पु. १. (पुरा.) पाषाणाची, हाडाची, धातूची बनवलेली आरी, टोचा. २. हुंडी; वही; कागद. (नंद.). ३. (भाकरीचा) तुकडा, कोर : ‘मग गोसावीं दोन्ही कोरके एकवट मेळवली’ - गोप्र ६१.
कोरकापी स्त्री. सुताराचे नक्षीकामाचे एक हत्यार. (को.)
कोरकांगुणी स्त्री. एक प्रकारचे धान्य पहा : कांगुणी
कोरकांगोणी स्त्री. एक प्रकारचे धान्य पहा : कांगुणी
कोरकांडे न. कोरफड. घृतकुमारी; कन्याकुमारी. (को.) [सं. कुमारी + कांड]
कोरके न. कोरडे अन्न : ‘तळणवळण केलें : कोरकें सिद्ध जाले :’ - सारुह ६·७२.
कोरखडी स्त्री. एक प्रकारचा खडू. शिंपी लोक हा खडू कापडावर खुणा करण्यासाठी वापरतात.
कोरखांड न. भाकरी किंवा पोळीचा तुकडा : ‘या अवघेयां कोरखांड आले’ - लीचउ १३१.
कोरगिरी   पहा : कोरबंदी
कोरगू पु. खेड्यातील एक बलुत्या. प्रवाशांची बडदास्त ठेवण्याचे काम याच्याकडे असे.
कोरट स्त्री. कातलेले पण कच्चे (न उकळलेले) रेशीम. [हिं. कोरा = साधे रेशीम]
कोरटाण स्त्री. कोरेपणाची घाण, वास (कपडे, मडकी वगैरेस येणारी).
कोरटे पु. कारळे तीळ.
कोरड वि. निष्ठुर, ज्याचे अंतःकरण द्रवत नाही असा : ‘एक कोरडे कणवाळु : विश्वासघातकी.’ - मुप्र २७६.
कोरड स्त्री. १. तोंड अथवा घसा याला पडलेला शोष (आजार, उपास, भय वगैरे प्रसंगी); तोंड वाळणे; कंठशोष. (क्रि. पडणे, येणे.) २. (सामा.) शुष्कपणा; ओलेपणा नसणे. (क्रि. पडणे.) ३. निश्चिंत : ‘मग आपण एथ कोरडी एति’ - लीचपू ३९७. [क. कोरगु = वाळणे, शुष्क होणे] (वा.) कोरड वळणे , वाळणे - क्षुधेने व्याकुळ होणे. ४. अंगण; घरापुढील उघडा ओटा. (तंजा.)
कोरडक न. घराच्या आढ्याला वा भिंतीला लोंबणारे कोळिष्टक, जळमट. (को.)
कोरडणे अक्रि. कोरडे पडणे, वाळणे : ‘बोलायाचे पुष्कळ शक्ति न कोरडले ओंठ ।’ - अनंततनयकृत माझे कुंडल (हृदय तरंग २).
कोरडणे न. ओझे आवळताना दोरी ज्यावरून ओढून घेऊन बांधतात तो लोखंडी मणी; पुली. (बे.) पहा : कोरडिके [क. कोरडु = लाकडाचा तुकडा]