शब्द समानार्थी व्याख्या
कृत्तिका स्त्री. सत्तावीस नक्षत्रांपैकी तिसरे. ह्या नक्षत्रपुंजात सात तारे आहेत. त्यांची आकृती देशी वस्तऱ्यासारखी दिसते. [सं.]
कृत्य न. काम; कृती; कार्य. [सं. कृ = करणे]
कृत्य न. (ग.) भूमितीत करायला सांगितलेली रचना; कृतिसापेक्ष सिद्धांत; वस्तुपाठ. [सं. कृ = करणे]
कृत्यपण न. करण्याची योग्यता : ‘मग कृत्यपणें खरें निगे । तें तुवां - ज्ञा १६·४६४
कृत्या स्त्री. १. विनाशक हेतूंसाठी आणि मंत्रतंत्र सिद्धीसाठी बळी देऊन प्रसन्न करून घेतात अशी स्त्री देवता; उग्र देवता; राक्षसी : ‘सर्वाहि चमू प्रेषी राजा भीमक्षयार्थ कृत्यासी ।’ - मोभीष्म ५·३२. २. (ल.) भांडखोर, कज्जे दलाल, कैदाशीण स्त्री. [सं.]
कृत्याकृत्य न. चांगले व वाईट काम; योग्यायोग्य कर्म; कार्याकार्य. [सं.]
कृत्याकृत्य वि. धन्य. पहा : कृतकृत्य : ‘देवाचा : भाग्याचा : मी कृत्याकृत्य केला’ - लीच ३·८६.
कृत्यैक्य न. नाटकाच्या कृतींमधील अपेक्षित एकात्मता.
कृत्रिम न. खोटेपणा; लबाडी; कपट; कावा : ‘कृत्रिम अवघेचि खुंटले ।’ - दास १९·९·५.
कृत्रिम वि. १. बनावट, करणीचे, कृतीचे. समासात - कृत्रिमवेष - रूप इ. २. मनुष्याने केलेले; नैसर्गिक नव्हे असे; अनैसर्गिक. [सं.]
कृत्रिम गर्भधारणा स्त्री. नर व मादी यांच्या प्रत्यक्ष संभोगाशिवाय मादीला गर्भवती करणे (नरप्राण्याचे रेत मादीच्या योनिमार्गातून गर्भाशयात घालून).
कृत्रिम तंतू   काही रसायने एकत्रित करून बनवलेला (संश्लेषित) धागा. रेशमी, सुती किंवा तागाचा - अशा नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या धाग्यांपेक्षा वेगळा धागा. उदा. नायलॉन, रेयॉन इ.
कृत्रिम लोणी न. मार्गारिन. (शेतकीशेतकरी न १९३७)
कृत्रिमतावाद पु. (मानस.) नैसर्गिक घटनांवर हेत्वारोप करण्याची मुलांमध्ये असणारी प्रवृत्ती. उदा. ढग का हलतात? - त्यांना हलावयाचे किंवा फिरावयाचे आहे म्हणून.
कृत्रिम नाणे   खोटे नाणे; कमी किमतीचे नाणे : ‘असलें कृत्रिम नाणें करून शेतकऱ्यांचे व नेटिव्ह व्यापाऱ्यांचे म्हणजे आपल्या बहुतेक सर्व प्रजेचे नुकसान करण्यास कोणत्याही दुसऱ्या देशातील सरकार तयार झालें असतें असें आम्हांस वाटत नाहीं.’ - लोटिकेले १·१५१.
कृत्रिम निवड   एका जातीतील अनेक वनस्पतींतून किंवा प्राण्यांतून मनुष्याच्या आवडीप्रमाणे (गरजेप्रमाणे) विशिष्ट गुणयुक्त प्रकारांची (प्राण्यांची) पैदाशीकरता किंवा संकर घडवून आणण्याकरिता केलेली निवड. कित्येक खाद्यवनस्पती किंवा पाळीव प्राणी माणसाने शेकडो वर्षे केलेल्या निवडीतूनच उगम पावले आहेत.
कृत्रिम पुत्र पु. मानलेला मुलगा; दत्तक मुलगा. हा आपल्या मातापितरांचे और्ध्वदेहिक करणारा, बारा वारसदारांपैकी एक आहे. [सं.]
कृत्रिमपुत्रिका स्त्री. मुलींच्या खेळातील बाहुली : ‘आणा चिरें सरस कृत्रिमपुत्रिकांशी ।’ - वामनविराट ५·१३३.
कृत्रिम बाहुली   (वै.) डोळ्यात शिरणारा प्रकाश कमी करण्याकरिता वापरण्यात येणारा सूक्ष्म छिद्र असणारा पडदा.
कृत्रिम युद्ध   १. डावपेचाचे युद्ध; गनिमी कावा. २. लटकी लढाई.
कृत्रिम रुपया   १. खोटा रुपया; बनावट रुपया. २. ज्यात सोळा आण्याची चांदी निघत नव्हती पण जो सरकारी कायद्याने सोळा आणे किमतीचा मानला जात असे असा रुपया : ‘हिंदुस्थानांत हल्ली कृत्रिम रुपयाचा प्रसार आहे.’ - भाच ९३.
कृत्रिम रेतन केंद्र न. (कृषि) जेथे माजावर आलेल्या गायी, म्हशी इ. प्राण्यांना कृत्रिम रीतीने गर्भधारणा करवली जाते ते ठिकाण.
कृत्रिम शत्रू   १. आपल्या कृत्यांनी तयार केलेला शत्रू. २. वरून शत्रुत्व पण आतून मित्रत्व असा माणूस.
कृत्रिमी वि. १. खोटा; कावेबाज; बेईमानी; ढोंगी : ‘मी काहीं लबाड कृत्रिमी नव्हे.’ - बाळ २·६८. २. बनावट; मुद्दाम केलेला; काल्पनिक; करणीचा. पहा : कृत्रिम
कृत्रिमी स्त्री. लबाडी; खोटी वागणूक.