शब्द समानार्थी व्याख्या
कोळंब पु. कोंडवाडा. (गो.)
कोळंब न. पु. शाकारणीचे तांबडे, जाडे गवत; तांबट; तांबेट.
कोळंबा न. पु. शाकारणीचे तांबडे, जाडे गवत; तांबट; तांबेट.
कोळंब पु. एक प्रकारचे भात. (कुलाबा, कु.)
कोळंब्या पु. एक प्रकारचे भात. (कुलाबा, कु.)
कोळंबा पु. पाणी भरण्याचा पोहरा; खापरी भांडे; मडके. पहा : कोळंबे [क. कोळबि = पोकळ नळी]
कोळंबी स्त्री. १. झिंगा मासा. (को.), २. गुरांना पाणी पाजण्याच्या उपयोगाची दगडी किंवा लाकडी कुंडी. हिचा उपयोग कपडे धुण्यासाठीही करतात. (गो.) (सामा.) लाकडी पात्र. पहा : कोळंबे
कोळंबे न. १. मातीचे रुंद तोंडाचे भांडे. फुलझाडांच्या कुंड्यांसाठी, जनावरांना पाणी पाजण्यासाठी व अंबोण ठेवण्यास याचा उपयोग करतात. (को. गो. कु.) २. रहाटाच्या लोट्याचे पाणी ज्यात पडते असे रहाटाच्यामध्ये असलेले लाकडी पात्र, डोणी. या डोणीची दोन्ही तोंडे बंद असून एका तोंडाजवळ खालच्या बाजूला भोक असते व त्यातून पाणी आडनळीत पडते. ३. विहिरीतून ओकतीने पाणी काढण्याकरता सुरमाडाच्या बुडख्याचे किंवा धातूचे केलेले पात्र; पोहरा. ४. कुंडीतील अथवा पाटातील पाणी बाहेर फेकण्याकरिता सुपाच्या किंवा पावड्याच्या आकाराचे भांडे; शेलणे. ५. (चर्मकार) चामडे भिजविण्याचे चांभाराचे खापरी अथवा दगडी पात्र; कुंडी; कोटमी.
कोळा पु. १. मोठा डास. २. जळता कोळसा : ‘सर्वांगी बांधौनि कोळे : लाविजति यके वेळे’ - ज्ञाप्र २९८.
कोळावे न. कोळी लोकांचा दरोडा, धाड. [क. कोळते = लुटालुट; दरोडा]
कोळिक पु. कोळी; कोळी जातीचा; वाटमारी करणारा : ‘वाटपाडा कोळिकु (वाल्मिकी).’ - ज्ञागा १२०.
कोळिगा पु. भ्रमर; भुंगा : ‘उदैजत पराबिंबीं । कळिकोळिगा राहिला कोंभी ।’ - ऋव ५६९.
कोळिता   पहा : कोळसुंदा
कोळिश्रय पु. १. रेशमाचा एक किडा : जैसा कोळिश्रयाचा बंध । तो तयांसचि करी बद्ध ।’ - कथा १·५. २. रेशमाच्या किड्याचे कोशीट, कोश. हा किडा औषधी असतो.
कोळिस्रा पु. १. रेशमाचा एक किडा : जैसा कोळिश्रयाचा बंध । तो तयांसचि करी बद्ध ।’ - कथा १·५. २. रेशमाच्या किड्याचे कोशीट, कोश. हा किडा औषधी असतो.
कोळिसरा पु. १. रेशमाचा एक किडा : जैसा कोळिश्रयाचा बंध । तो तयांसचि करी बद्ध ।’ - कथा १·५. २. रेशमाच्या किड्याचे कोशीट, कोश. हा किडा औषधी असतो.
कोळिष्णा   पहा : कोळसन
कोळिसणे सक्रि. विझणे; कोळपणे : ‘की विरहाग्नि मनीं कोळिसैला ।’ - नवि १३५.
कोळिसरा पु. न. एक प्रकारचा झुरळासारखा प्राणी.
कोळिसा पु. न. एक प्रकारचा झुरळासारखा प्राणी.
कोळिसे पु. न. एक प्रकारचा झुरळासारखा प्राणी.
कोळिसरी स्त्री. एक झुडूप; गवताचा एक प्रकार. पहा : कोळसुंदा
कोळी पु. १. जळत्या किंवा जळलेल्या वातीची काजळी. [क. कोळ्ळी], २. एक जात व त्या जातीचा माणूस. मासे पकडणे, विकणे व नावाड्याचा व्यवसाय करणारी जात. याच जातीतील काही लोक डोंगरात, अरण्यात राहून, शिकार करून उदरनिर्वाह करतात. प्राचीन ग्रामसंस्थेत कोळ्याकडे पाणी पुरविण्याचे काम असे. धीवर ही एक गुन्हेगार जात समजली जात होती. पण यांच्यापैकी फक्त महादेव कोळी (राजकोळी) व गुजराथकोळी याच दोन पोटजाती गुन्हे करत असत. ३. कोळी नावाचा किडा. हा आपल्या अंगातून धागा काढतो व त्याचे जाळे बनवितो. ४. पाण्यात राहणारा एक पक्षी. [सं. कौल, कौलिक]
कोळीण स्त्री. १. कोळी जातीतील बाई. २. कोळी किड्याची मादी. ३. शिमग्याच्या सणात कोळणीचे सोंग काढून नाचणारा पुरुष. ४. नायकीण. (नाशिक) ५. कोळी पक्ष्याची मादी. ६. रानडुकराची मादी : ‘कोळीण आपल्या पिलांसह वसवसत बाहेर पडली होती.’ - श्रीयो १·३०२.
कोळीलाकडी स्त्री. जंगलातून तोडून आणलेल्या लाकडावरील कर, दस्तुरी.