शब्द समानार्थी व्याख्या
कोंडुळे   पहा : कोडुळे
कोंडे न. १. पणती; चिकोरी; पणतोली. २. पाणसाप (बेडूक खाणारा). (को.)
कोंडेकड न. नवीन तांदळाच्या कोंड्याचे लहान पापड केळीच्या सोपटाच्या किंवा कोहळ्याच्या पाण्यात याचे पीठ भिजवतात. (कुलाबा)
कोंडो पु. १. बांबू. २. जमीन मोजण्याचे माप. (गो.) पहा : कोंडा
कोंड्या पु. माडी, ताडी ठेवायचा भोपळा. हा ताडीच्या झाडाला टांगून ठेवतात. २. एक झाड.
कोंढ्या पु. माडी, ताडी ठेवायचा भोपळा. हा ताडीच्या झाडाला टांगून ठेवतात. २. एक झाड.
कोंड्यामुरूम पु. भुसभुशीत, ठिसूळ मुरूम.
कोंढ न. १. कुंपण; गावकुसू : ‘इंद्रियग्रामीचे कोंढ । - राज्ञा २·२३७. २. कोंदण. ३. (ल.) खोल : ‘डोळे कोंढनी जाती ।’ - ज्ञाप्र ८२३.
कोंढ पु. कुंड.
कोंढाण न. कोंदण; डोळ्यांची खोबण.
कोंढाळे   पहा : कोंडाळे
कोंढी स्त्री. १. मिठागर; खाचर. २. पहा : कुंडी, कोंडी
कोंता वि. कोणता; काय : ‘याच्यात बाईचाभी कोंता कसूर आहे?’ - अजून १३.
कोंद स्त्री. भाजलेले तीळ कुटून त्यात गूळ घालून तयार केलेले पुरण, लाडू इ. : ‘तिळाच्या कोंदेंची पोळी.’ - पाक ५४.
कोंद पु. तांदळाचा कोंडा. (व.)
कोंदट वि. चोहोकडून हवा येण्याला प्रतिबंध असलेली; आडोशाची; कोंडमाऱ्याची (खोली, जागा).
कोंदाट वि. चोहोकडून हवा येण्याला प्रतिबंध असलेली; आडोशाची; कोंडमाऱ्याची (खोली, जागा).
कोंदटणे   पहा : कोंदणे : ‘अचानक आकाश कोंदटले.’ - स्मृचापा १६१.
कोंदण न. १. अलंकारावर रत्ने बसविण्यासाठी केलेले घर, बैठक, जेडा : ‘सौंदर्य हे साधुवृत्तीच्या कोंदणांत अधिकच सुंदर दिसतें.’ - नीति ८६. [क. कुंदन = सोने]
कोंदणपट्टी स्त्री. रत्ने बसविण्याकरिता तयार केलेली सोन्याची तारपट्टी, पत्रा.
कोंदणे उक्रि. १. जोराने आत भरणे, दाबणे, कोंबणे; खच्चून, ठासून भरणे. (धुराने घर, मेघांच्या गडगडाटाने आकाश, आनंदातिशयाने मनुष्य इ.) : ‘इहीं दोहीचि परि संसारू । कोंदला असे ॥’ - ज्ञा १५·४७६. २. बंद होणे; छिद्र, भोक बुजणे.
कोंदाकोंदी स्त्री. दाटी; खेचाखेच; भीड; गर्दी : ‘माझारीचि कोंदाकोंदी ।’ - ज्ञा १५·१५६.
कोंदाट स्त्री. विपुलता; पूर्णता; दाटी : ‘कर्पूरकर्दळीची गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें ।’ - ज्ञा ११·२५०.
कोंदाट वि. पहा : कोंदट
कोंदाटणे उक्रि. गच्च भरणे; एके ठिकाणी गर्दी करणे; ठासून भरणे; कोंबणे : ‘तेजें कोंदाटलिया दिसा । जयाचेनि ॥’ - ज्ञा १·१३९.