शब्द समानार्थी व्याख्या
कौम स्त्री. १. रूढी; प्रथा : ‘नवीनच कौम पैदा होत आहे.’ - विजी १६६. २. वंश; जात; जमात; लोक. [फा.]
कौमारत्व न. बालपण; पाच ते दहा पर्यंतचे वय; कुमारपण : ‘एथ कौमारत्व दिसे ।’ - ज्ञा २·१०९. [सं.]
कौमुदी स्त्री. चांदणे; चंद्रप्रकाश. [सं.]
कौर पु. मोसंबी; नारिंग.
कौल न. घराच्या छपरावर आच्छादनासाठी घातलेले मातीचे पन्हळ (चपटे, नळीवजा, मंगलोरी). [सं. कोलक] (वा.) घरावर कौल राहू न देणे - एखादे कुटुंब समूळ नष्ट करणे.
कौल पु. १. वचन; आश्वासन; अभय; संरक्षणाची हमी : ‘मी तुला कौल देतो, सरदारकी देतो’ - श्रीयो १·४२२. २. जमिनीची लागवड करण्यासाठी किंवा व्यापार करणाऱ्याला सरकार जे अभयपत्र, करार, कबुलायतीचा कागद देते तो. सरकारी करारनामा; कबुलायत; कौलनामा : ‘तुम्हांस चि. रा. माधवराव नारायण याचा कौल.’ - मइसा १२·१३७. ३. जहाजांना सर्व समुद्रातून फिरण्याचा मुख्य सत्तेने दिलेला परवाना. ४. परवाना; अभयपत्र. (शत्रूला आपल्या प्रांतातून जाण्यासाठी दिलेले); माफी देणे; सूट देणे : ‘दंगेखोर गनीम आपण जेर झालों असें जाणून दगाबाजीनें कौल घेतो, म्हणून जवळ बोलावूं नये. - मराआ ३६. ५. ईश्वरी वचन; ईश्वराची आशा मिळविणे; प्रश्न; साक्ष; प्रसाद; देवाजवळ गाऱ्हाणे सांगून त्यावर अमुक उपाय करावा किंवा नाही हे विचारताना देवाच्या अंगाला लावायचे तांदूळ, सुपाऱ्या, फूल इ.; देवाची संमती : ‘इंद्रियांचे पेटे भला कौल देती ।’ - तुगा ४०८. ६. अभिप्राय; मत; कल (क्रि. मागणे, देणे.) [फा.] (वा.) कौलास येणे - शरण येणे; तह करायला कबूल होणे : ‘झालें मोंगल बेजार मरूं लागले आले कौलाला ।’ - ऐपो २३६.
कौलअहद पु. वचन; कौल : ‘त्यावरून म्यां त्याजला कौलअहद दिधला.’ - मइसा ६·५७०. [का. कोल + अहद]
कौलकरार पु. लेखी करारमदार; कबुली; ठराव; वचन; आश्वासन; अटींना संमती. [फा.]
कौलकरारदाद पु. वचन : ‘हज्रतसाहेबाचा तरी कौलकरारदाद आपल्यास आहे कीं तुमचे जागीरपैकीं एक चावर कसोदगी करणें नाहीं.’- इमं ६७.
कौलगी पु. कर्नाटकातील पाळेगारांच्या पदरचा फडणीस. असे कौलगी त्या त्या पाळेगारांच्या मुलखात कर्णिक - कुलकर्ण्यासारखे नेमलेले असत.
कौलनामा पु. १. सरकारने शेतकऱ्याला करून दिलेले करारपत्र; लेखी करार; कबुलायत. २. (कायदा) भाडेपट्टा.
कौलपत्रक न. गावातील कमी साऱ्याच्या जमिनींचा हिशेब असलेले पत्रक.
कौलप्रसाद पु. १. गुरवाने देवतेचे अनुमोदन मिळविण्याकरिता अंगाला लावलेले कळे, फुले वगैरे खाली पडून प्रश्न विचारणाऱ्याला दिलेले उत्तर अथवा प्रसाद. (को.) २. कौल मागताना लावलेली फुले वगैरे. (क्रि. लावणे, लागणे). पहा : कौल ५
कौलव न. (ज्यो.) एका करणाचे नाव. प्रत्येक चांद्रमासात ६, १३, २०, २७ या तिथींच्या पूर्वार्धात हे करण असते. तसेच २, ९, १६, २३ या तिथींच्या उत्तरार्धात हे करण असते. करणाचा स्वामी मित्र. याचे फल शुभ आहे.
कौला पु. एक भाजी. कौल्याची भाजी कोकणात प्रसिद्ध आहे. हे झुडूप वीतभर उंच वाढत असून रानात पावसाळ्यात उगवते. याची भाजी श्रावण सोमवारी अवश्य खावी असे म्हणतात.
कौला पु. न. एक मोठ्या जातीचे नारिंग. याची साल आतील फोडीयुक्त भागापासून, गरापासून सुटी निघते. सालीला कडवट वास येतो. [हिं.]
कौले पु. न. एक मोठ्या जातीचे नारिंग. याची साल आतील फोडीयुक्त भागापासून, गरापासून सुटी निघते. सालीला कडवट वास येतो. [हिं.]
कौलागम न. मंत्रशास्त्र. [सं. कौल = शाक्तपंथ + आगम]
कौलाफोक वि. कोवळा आणि सरळ (झाड, वनस्पती, रोपटा); तरुण व ताठ (मनुष्य, सौंदर्यलक्षण).
कौलार न. कौले घातलेले छप्पर.
कौलारु न. कौले घातलेले छप्पर.
कौला लसलसीत   कोवळा लुसलुशीत; नाजूक; नवीन; ताजा; कोवळा; जोमदार आणि टवटवीत (झुडूप, फळ). [सं. कोमल + लस् = लसित]
कौलावण स्त्री. १. सरकारी कौल; परवाना मिळविण्यासाठी द्यायची पट्टी, किंमत, फी. २. (नाविक) गलबताचा नोर; गलबतातून जाण्यायेण्यासाठी पडणारे मूल्य.
कौलासणे सक्रि. विसर्जन करणे : ‘गणपती मुहूर्ती होत होत्या त्या देवालये पुस्करणीस कौलासावयास जात होत्या.’ - आंपव्य ३.
कौलिक वि. वंशपरंपरागत; वडिलोपार्जित; वारसाने आलेले. [सं. कुल]