शब्द समानार्थी व्याख्या
कौस्तुकी स्त्री. घोड्याच्या गळ्याखाली लोंबणारी पोळी. - अश्वप १·९९. [सं. कौस्तुभ]
कौळमार्गी वि. वाममार्गी; मांत्रिक.
कौळिक स्त्री. कावीळ. हा रोग झाल्यास डोळे पिवळे पडतात आणि सर्वत्र पिवळे दिसते. : ‘जाणिजे कौळिक ।’ - भाए ७४६.
कौळिक पु. कोळी; भिल्ल; व्याध; निषाद : ‘मातीयेचा द्रोण केला । तो कौळिका भावो फळला ।’ - एभा १·४३. [सं. कोल]
कौळिकाचारू पु. मांत्रिकाचे कृत्य; जादूटोणा : ‘उपदेशूनि कौळिकाचार । केंवि मातें करविसी ।’ - मुआदि २७·११६.
कौळी स्त्री. एक झुडूप; कावळी. [सं. काकनासा]
कौक्ष वि. ओटीपोटासंबंधी; पोटासंबंधी; कुक्षीसंबंधी. [सं. कुक्षि]
कौक्षेपक न. खड्‌गाचा एक प्रकार. [सं.]
कौंतिक पु. भालेकरी. [सं. कुंत = भाला]
कौंती स्त्री. भाला; एक हत्यार. [सं. कुंत]
कौंदा पु. भुस्सा.
कौंभणे अक्रि. पहा : कौंभणे : ‘कैवल्यद्रुम कौंभिला ।’ - भाए ३.
कौंस पु. वर्तुळाच्या परिघाचा कोणताही भाग. [फा. कौस = धनुष्य]
कौंस न. दर्भ.
क्याच न. लाकडाचा मधला भाग, गाभा. (बे.) [क. कच्चु]
क्याट न. एक प्रकारचे रेशीम (लुगड्यांचा व्यापारात रुढ). (कर.)
क्याटी न. बावन तोळ्यांचे वजन : ‘क्याटीचे वजन बावन तोळे असते.’ - मुंव्या ११९.
क्यातखुरपे न. दाते व पाठीकडे धार असलेला कोयता, खुरपे (बे.) [क. कत्ति = कोयता]
क्यारी स्त्री. १. गर्जना : ‘जिंतले रे जिंतले भणौनि देयारी क्यारी ।’ - मुप्र २५०२. २. भातजमीन; खाचर; भोवती उंच कडा असलेला वाफा. ३. पुष्पवाटिका; वाफा (बागेतील फुलांचा). [गु.] [सं. केदार]
क्यारडी स्त्री. १. भातजमीन; खाचर; भोवती उंच कडा असलेला वाफा. २. पुष्पवाटिका; वाफा (बागेतील फुलांचा). [गु.] [सं. केदार]
क्याल न. केळीचे काल, गाभा (कु.). पहा : काल [सं. कदल]
क्युसेक पु. (एका मिनिटाला एक घनफूट एवढ्या) प्रवाहाच्या आकारमानाचे एकक, युनिट.
क्युरीबिंदू पु. (भौ.) ज्या तापमानाला चुंबकीय गुणधर्म बदलतात तो बिंदू. उदा. ७६८⁰ से. या तपमानाला लोखंडाचे चुंबकत्व नष्ट होते.