शब्द समानार्थी व्याख्या
क्रियापार पु. मृत्यूनंतरचे धार्मिक विधी पुरे करणे; अंत्यविधी : ‘तेयाचे क्रियापारु करितां उसीरु लागैल :’ - लीचपू ८५.
क्रियाप्रचोदन न. (मानस.) केवळ वर्तन करण्याची प्रेरणा.
क्रियाबंध पु. १. (मानस.) प्रतिक्षेपसदृशक्रिया; परिणामांचा विचार न करता फक्त वर्तनाच्या दृष्टिकोनातून पाहिलेला क्रियेचा दुवा; वर्तनसंधान. २. (भाषा) वाक्यातील क्रिया व्यक्त करणारा एक शब्द वा अनेक शब्दांचा समुदाय.
क्रियाबाल वि. १. (कायदा) अज्ञान; अप्रौढ (माणूस); देणे, घेणे इ. व्यवहार करायला ज्याला कायद्याने प्रौढत्व प्राप्त झाले नाही असा. २. असमर्थ; नालायक (माणूस-देवघेवीत).
क्रियाभ्रष्ट वि. १. वचनभ्रष्ट; वचन, शपथ न पाळणारा. २. कृतघ्न; उपकार न जाणणारा. ३. नित्यनैमित्तिक कर्मे न करणारा; धर्मभ्रष्ट.
क्रियारूप न. (व्या.) क्रियापदाचे वचन, पुरुष, काल इ. भेदाने होणारे रूप.
क्रियारोधी (काच)   (शा.) अनेकविध द्रव्यांचा सहजासहजी परिणाम न होणारी (काच).
क्रियायोग पु. तप, स्वाध्याय व ईश्वराची ध्यानधारणा.
क्रियावाद पु. क्रिया, विकार इ. गोष्टी आत्म्यावर आपली छाप बसवितात असे प्रतिपादणारे एक मत; वैशेषिक व जैन तत्त्वज्ञान यातून हा वाद सापडतो. हा वेदांत, सांख्य, योग, बौद्धमत यातून दिसतो.
क्रियावान वि. शास्त्राप्रमाणे विहित आचरण करणारा; नित्य - नैमित्तिक नियम पाळणारा : ‘जो वेदार्थ करणार पंडित । त्याहून अनुष्ठानी क्रियावंत । शतगुणें आगळा ।’ - ह ३४·१००. [सं.]
क्रियावंत वि. शास्त्राप्रमाणे विहित आचरण करणारा; नित्य - नैमित्तिक नियम पाळणारा : ‘जो वेदार्थ करणार पंडित । त्याहून अनुष्ठानी क्रियावंत । शतगुणें आगळा ।’ - ह ३४·१००. [सं.]
क्रियाविधिवाद पु. (तत्त्व.) अमुक एका पद्धतीने नियमबद्ध कर्म करण्याची रीत म्हणजेच कर्मकांड; आचार, कर्मकांड यावर भर असणारा वाद, मत. [सं.]
क्रियाविभव न. (मानस.) मज्जा किंवा स्नायू यांच्या कार्याशी संबंधित होणारा विद्युतविभव.
क्रियाविशेषण न. ज्या शब्दाच्या योगाने क्रियेच्या गुणाचा अथवा प्रकाराचा, किंवा अमुक एका विशिष्ट अवस्थेचा बोध होतो तो शब्द. जसे :- तो हळू चालतो. काही क्रियाविशेषणे मूळ नामांची विभक्त्यंत रूपे असतात. उदा. बुद्ध्या. [सं.]
क्रियाविज्ञान न. शरीरांतर्गत चयापचयातील (पचन, शोषण, अभिसरण इ.) अनेक क्रियाविक्रियांसंबंधीची माहिती.
क्रियाशील वि. १. धार्मिक नियम पाळणारा; तत्त्वाला धरून वागणारा. २. प्रत्यक्ष कार्य करणारा कोणत्याही संस्थेचा सदस्य; उद्योगी. जसे :- क्रियाशील कार्यकर्ता. [सं.]
क्रियाशील किरण   (भौ.) उत्सर्जनक्षम किरण.
क्रियाशील थर   (भूशा.) ज्या थरामध्ये किरणोत्सर्गदृष्ट्या क्रियाशील खनिजे आहेत असा खडकाचा थर.
क्रियाशील प्रारण   (भौतिक, रसा.) दृश्य किंवा अदृश्य परंतु रासायनिक बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेले विशेषतः अदृश्य प्रारण. [सं.]
क्रियाशील भांडवल   (अर्थ.) उत्पादनासाठी प्रत्यक्ष वापरात असलेले भांडवल.
क्रियाशून्य वि. निष्क्रिय. [सं.]
क्रियाश्रय पु. (व्या.) कर्ता (क्रियापदाचा); क्रियेचे प्रधान कारक. [सं.]
क्रियासंस्था स्त्री. प्रतिक्रियेशी संबंधित मज्जा, स्नायू व ग्रंथिसमूह.
क्रियांगराग पु. (संगीत) शास्त्रातील नियम कायम ठेवून विचित्रतेसाठी विवादी स्वरांचा उपयोग ज्या रागात केला जातो असा राग. [सं.]
क्रियोपन्यास पु. प्रमाणांचे प्रतिपादन; पुरावा दाखविणे. [सं.]