शब्द समानार्थी व्याख्या
क्रउ पु. खरेदी, खरेदीची किंमत.
क्रकच पु. न. करवत. [सं.]
क्रकचमक्षिका स्त्री. (प्राणि.) झाडाच्या पानाला व फांदीला भोके पाडून पानावर अंडी घालणारी माशी. [सं.]
क्रकचयोग पु. एक अशुभ योग : ‘तिथीचा अंक आणि वाराचा अंक यांची बेरीज १३ होते तेव्हा अशुभ क्रकचयोग होतो.’ - सुज्यो २४७. [सं.]
क्रण न. करण; साधन (योगमार्गातील) : ‘चाऱ्ही क्रणें प्रगटली’ - लीचपू २०६.
क्रतु पु. १. यज्ञ : ‘म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु ।’ - ज्ञा ३·१३९. २. (प्रामुख्याने) अश्वमेध यज्ञ. ३. सप्तऋषींपैकी एक ऋषी. [सं.]
क्रतू पु. १. यज्ञ : ‘म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु ।’ - ज्ञा ३·१३९. २. (प्रामुख्याने) अश्वमेध यज्ञ. ३. सप्तऋषींपैकी एक ऋषी. [सं.]
क्रदंत   पहा : कृतांत
क्रम पु. १. वर्ग; अनुक्रम. २. व्यवस्था; मांडणी; पद्धत; काही नियमानुसार चालणे; मोड. ३. प्रगती; पुढे जाणे; क्रमण. ४. धार्मिक विधी; नियम. ५. (संगीत) स्वरांचा आरोह. ६. परंपरा; सरणी; संप्रदाय. [सं.]
क्रमआगत वि. क्रमप्राप्त; वारसाने मिळालेला (वाटा).
क्रमआगयात वि. क्रमप्राप्त; वारसाने मिळालेला (वाटा).
क्रमगामी शिक्षा स्त्री. पु. (विधि.) एकूण शिक्षा, दंड.
क्रमगामी दंडादेश स्त्री. पु. (विधि.) एकूण शिक्षा, दंड.
क्रमचय   (ग.) वस्तूंचा संच किंवा त्या संचातील काही घटकांची क्रमिक तऱ्हेने केली जाणारी मांडणी.
क्रमचित्र न. औद्योगिक प्रक्रियेतील साधनसामग्री वा कामाची प्रणाली यांचा अनुक्रम वा आनुपूर्वी दाखवणारा आलेख.
क्रमण न. गती; गमन; पुढे जाणे; पुढे पुढे सरणे; चालणे; प्रगती. [सं.]
क्रमणे अक्रि. १. (वेळ, काळ) आनंदात काढणे, घालविणे, करमणे. २. आक्रमण करणे, पुढे जाणे, चालणे; ओलांडणे; पलीकडे जाणे; उल्लंघणे : ‘क्रमी ध्यानाचें चवरें । सांपडे तंव ॥’ - ज्ञा ६·५८. ३. मरणे : ‘संवसारें जालों अतिदुःखे दुःखी । मायबापें सेखीं क्रमिलिया ।’ - तुगा ६५३. [सं. क्रम् = जाणे]
क्रमत्रैराशिक पु. न. सरळ त्रैराशिक. [सं. क्रम = जाणे]
क्रमपाठी वि. वेदसंहितेतील दोन दोन पदांचा अनुक्रम धरून एक वाक्य तयार करून पठण करणे व पठण करताना मागील पद पुढील पदाला जोडणे, याप्रमाणे अध्ययन करणारा. उदा. ‘अग्निमीळे । ईळे पुरोहितम् । पुरोहितयज्ञस्य ।’ इ. ह्याप्रमाणे जटापाठी, घनपाठी, शाखापाठी असे अध्ययन करणाऱ्यांचे दुसरे वर्ग आहेत. [सं.]
क्रमप्राप्त   पहा : क्रमागत
क्रममार्ग पु. रुळलेला, नेहमीचा मार्ग, धोटप मार्ग, सनदशीर मार्ग : ‘क्रांतिमार्ग क्रममार्गापेक्षां नेहमींच वाईट असतो असें नाहीं, पण बहुधा तो वाईट असतो.’ - सुदे १११.
क्रममुक्ति स्त्री. (तत्त्व.) मानवलोक, पितृलोक, गंधर्वलोक व ब्रह्मलोक या क्रमाने आत्म्याला होणारा साक्षात्कार व शेवटी मुक्ती; देवयान मार्गाने मिळणारा मोक्ष. [सं.]
क्रममुक्ती स्त्री. (तत्त्व.) मानवलोक, पितृलोक, गंधर्वलोक व ब्रह्मलोक या क्रमाने आत्म्याला होणारा साक्षात्कार व शेवटी मुक्ती; देवयान मार्गाने मिळणारा मोक्ष. [सं.]
क्रमयोग पु. क्रमाक्रमाने आत्मविकास साधणे.
क्रमयोगी पु. क्रमाक्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेणारा योगी : ‘हे मज मिळतिये वेळे । तयां क्रमयोगियां फळें ।’ - ज्ञा १८·११३४.

शब्द समानार्थी व्याख्या
क्रमरचना स्त्री. (विधि.) क्रम ठरवून केलेली रचना.
क्रमवाचक चिन्ह   (ग्रंथ.) वर्गीकरणामध्ये विषय क्रम दाखवणारे चिन्ह.
क्रमवाचक संख्याविशेषण न. संख्येचा अनुक्रम दाखवणारे विशेषण.
क्रमवाद पु. विवक्षित उद्दिष्ट हळूहळू टप्प्याटप्प्यांनी गाठणे हे तत्त्व किंवा मतप्रणाली. [सं.]
क्रमवार क्रिवि. क्रमाला धरून : ‘विभाग, उपविभाग, तुकड्या, पथके इत्यादींची क्रमवार नियुक्ती करणे...’ - युजि ७८.
क्रमशः क्रिवि. ठरावीक पद्धतीने; क्रमाने; व्यवस्थितपणे; एकामागून एक अशाप्रकारे. [सं.]
क्रमसमता स्त्री. (भूशा.) भूवैज्ञानिक इतिहासात एकाच कालखंडात निर्माण झालेल्या खडकांचे नाते सुचविणारी संज्ञा.
क्रमागत वि. क्रमाने प्राप्त झालेला, असलेला; वंशक्रमाने, वारसाने मिळालेला (वाटा, जिंदगी); एकामागून एक अशा क्रमाने येणाऱ्या संख्या. [सं.]
क्रमागयात वि. क्रमाने प्राप्त झालेला, असलेला; वंशक्रमाने, वारसाने मिळालेला (वाटा, जिंदगी); एकामागून एक अशा क्रमाने येणाऱ्या संख्या. [सं.]
क्रमान्वित अध्ययन   (शिक्षण) विषयघटकांचे निश्चित केलेल्या टप्प्यांनी घेतलेले स्वयंशिक्षण.
क्रमिक वि. १. क्रम असणारा. २. इयत्तावार नेमलेले; अभ्यासासाठी लावलेले (पुस्तक इ.) : ‘शिकविल्या गेलेल्या क्रमिक पुस्तकांची यादी मिळत नाहीं.’ - केले १·१४३. पहा : क्रमागत [सं.]
क्रमिकता स्त्री. १. प्रवणक. २. ठरावीक पायऱ्या किंवा अंशानी कमी होणारा उतार.
क्रमिक समंक   (ग्रंथ.) वर्गीकरणपद्धतीत वाचनसाहित्याला वर्गीकरणातील चिन्हांचा उपयोग करून दिलेला क्रमांक. या क्रमांकाखाली वाचनसाहित्याची नोंद करावी लागते.
क्रमुक पु. सुपारीचे झाड. [सं.]
क्रमोत्क्रम पु. व्यवस्था आणि अव्यवस्था; योग्य व अयोग्य रचना, जुळणी.
क्रमोत्क्रम क्रिवि. सुलट्या व उलट्या क्रमाने. [सं. क्रम + उत्क्रम (व्युत्क्रम)]
क्रय पु. १. खरेदी; पदार्थ विकत घेणे; विकत घेताना दिलेले पैसे. २. विक्री; घेतलेले पैसे.
क्रय न. विकून आलेली किंमत. (गो.) [सं. क्री = विकत घेणे]
क्रयविक्रय पु. देवघेव; खरेदीविक्री; सौदा; व्यापार.
क्रयविवाह पु. (समाज.) मुलीच्या वडिलांस पैसे देऊन केलेला विवाह.
क्रयशक्ति स्त्री. (अर्थ.) १. माल खरीदण्याची क्षमता. २. ठरावीक चलन व त्याच्या बदल्यात मिळणारा माल यांचा परस्पर संबंध. [सं.]
क्रयशक्ती स्त्री. (अर्थ.) १. माल खरीदण्याची क्षमता. २. ठरावीक चलन व त्याच्या बदल्यात मिळणारा माल यांचा परस्पर संबंध. [सं.]
क्रय्य वि. खरेदीविक्रीला योग्य; विकण्यासाठी बाजारात आलेला; विकण्यासाठी काढलेला (पदार्थ). [सं.]
क्रव्य न. कच्चे मांस. [सं.]
क्रव्याद वि. १. कच्चे मांस खाणारे (वाघ, सिंह इ.); राक्षस, पशू वगैरे मांसभक्षक. २. दुष्ट; राक्षस-वृत्तीचा : ‘तुझी क्रव्यादा आई’ - निक ८२. (व.)

शब्द समानार्थी व्याख्या
क्रंदन न. रडणे. पहा : आक्रंदन [सं.]
क्रांत क्रिवि. १. व्याप्त; उल्लंघलेला; आक्रमिलेला. २. (समासात) चालून गेलेला; हल्ला केलेला. जसे :- चोरक्रांत, टोळक्रांत, राजक्रांत इ. पहा: आक्रांत. ३. व्याकूळ; विव्हळ; व्याप्त (दुःख इ.नी) : ‘एकें तियें बहुदुःखें I क्रांत भूतें ॥’ - ज्ञा १५·४१२.
क्रांत स्त्री. (क्रांतीचे संक्षिप्त रूप) चाल; हल्ला; धाड (मुख्यत्वे चोर, शत्रू, टोळ यांची). [सं. क्रांति]
क्रांतणे उक्रि. १. पादाक्रांत करणे; चालून जाणे; आक्रमणे (देश, रस्ता इ.) २. व्याकूळ होणे (भूक, दुःख, श्रम, झोप, कर्ज, दारिद्र्य यांमुळे).
क्रांतदर्शित्व न. भूत व भविष्य पाहण्याची शक्ती; द्रष्टेपणा. [सं.]
क्रांतदर्शी वि. त्रिकालज्ञ; दीर्घदर्शी; ज्ञानी; त्रिकालदर्शी; वर्तमानकालाच्या मर्यादा ओलांडून भूत किंवा भविष्य पाहू शकणारा : ‘एथ मोहले गा क्रांतदर्शी I’ - ज्ञा ४·८८. [सं.]
क्रांतमति वि. ज्ञानी : ‘तऱ्हीं गा क्रांतमती I कारण हें ॥’ - राज्ञा १३·४५०.
क्रांतमती वि. ज्ञानी : ‘तऱ्हीं गा क्रांतमती I कारण हें ॥’ - राज्ञा १३·४५०.
क्रांति   १. विषुववृत्तापासून खस्थ पदार्थाचे अंतर (हे याम्योत्तर वृत्तावर मोजले जाते); अपम. २. सूर्याचा गमनमार्ग (क्रांतिवृत्तावरून). ३. क्रमण; मर्यादा ओलांडून पलीकडे जाणे; प्रगती. ४. राजकीय, सामाजिक, आर्थिक इ. क्षेत्रांत घडून येणारे, जुनी व्यवस्था पार बदलून टाकणारे परिवर्तन. जसे :- हरितक्रांती, सामाजिक क्रांती; शस्त्रबलाने चालू सत्ता उलथून टाकणे, बंड. [सं.]
क्रांती   १. विषुववृत्तापासून खस्थ पदार्थाचे अंतर (हे याम्योत्तर वृत्तावर मोजले जाते); अपम. २. सूर्याचा गमनमार्ग (क्रांतिवृत्तावरून). ३. क्रमण; मर्यादा ओलांडून पलीकडे जाणे; प्रगती. ४. राजकीय, सामाजिक, आर्थिक इ. क्षेत्रांत घडून येणारे, जुनी व्यवस्था पार बदलून टाकणारे परिवर्तन. जसे :- हरितक्रांती, सामाजिक क्रांती; शस्त्रबलाने चालू सत्ता उलथून टाकणे, बंड. [सं.]
क्रांतिक वि. सीमादर्शी. [सं.]
क्रांतिक कोन   (भौ.) प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना जेव्हा पूर्ण परावर्तित होतात तेव्हा त्या किरणांचा होणारा आपात लघुतम कोन.
क्रांतिक गुणोत्तर   (शाप.) कोणत्याही दोन सांख्यिकी मूल्यांमधील फरक महत्त्वाचा आहे किंवा नाही हे ठरविण्याकरिता काढण्यात येणारे गुणोत्तर.
क्रांतिकक्ष पु. क्रांतिवृत्त. [सं.]
क्रांतिकारक पु. वि. १. चळवळ्या; बंडखोर; प्रस्थापित सत्ता (सामान्यतः शस्त्रबळाने) उलथून पाडण्याची चळवळ करणारा माणूस, गोष्ट : ‘पुण्यातील क्रांतिकारक तरुणांनीं त्यांना मुख्य नेमलें.’ - इंप ९३. २. समाजव्यवस्थेत महत्त्वाचे बदल घडवून आणू पाहणारा. [सं.]
क्रांतिपात पु. विषुववृत्ताला क्रांतिवृत्त जेथे छेदते तेथील बिंदू; संपात बिंदू. [सं.]
क्रांतिपातगति स्त्री. अयनचलन; अयनगती; विषुवायन. [सं.]
क्रांतिपातगती स्त्री. अयनचलन; अयनगती; विषुवायन. [सं.]
क्रांतिबिंदु पु. आणीबाणीची वेळ; जिथून परिस्थितीला कलाटणी मिळते तो क्षण, तो बिंदू. [सं.]
क्रांतिबिंदू पु. आणीबाणीची वेळ; जिथून परिस्थितीला कलाटणी मिळते तो क्षण, तो बिंदू. [सं.]
क्रांतिमंडळ न. सूर्याच्या गमनमार्गाचे वृत्त, कक्षा; सूर्याची भूमध्यरेषेच्या उत्तरेकडील २३॥ अंश व दक्षिणेकडील २३॥ अंश जाण्याची मर्यादा. त्यामधील बिंदू साधले म्हणजे होणारे वृत्त : ‘ज्या गमनमार्गांतून वार्षिक गतीनें भूगोल सूर्याभोंवतीं फिरतो किंवा सूर्य भूगोलाभोवतीं समोरच्या राशीतून फिरतोसें दिसते त्या गमनमार्गास क्रांतिवृत्त म्हणतात.’ - सूर्य १२. [सं.]
क्रातिवृत्त न. सूर्याच्या गमनमार्गाचे वृत्त, कक्षा; सूर्याची भूमध्यरेषेच्या उत्तरेकडील २३॥ अंश व दक्षिणेकडील २३॥ अंश जाण्याची मर्यादा. त्यामधील बिंदू साधले म्हणजे होणारे वृत्त : ‘ज्या गमनमार्गांतून वार्षिक गतीनें भूगोल सूर्याभोंवतीं फिरतो किंवा सूर्य भूगोलाभोवतीं समोरच्या राशीतून फिरतोसें दिसते त्या गमनमार्गास क्रांतिवृत्त म्हणतात.’ - सूर्य १२. [सं.]
क्रांतिवलय न. सूर्याच्या गमनमार्गाचे वृत्त, कक्षा; सूर्याची भूमध्यरेषेच्या उत्तरेकडील २३॥ अंश व दक्षिणेकडील २३॥ अंश जाण्याची मर्यादा. त्यामधील बिंदू साधले म्हणजे होणारे वृत्त : ‘ज्या गमनमार्गांतून वार्षिक गतीनें भूगोल सूर्याभोंवतीं फिरतो किंवा सूर्य भूगोलाभोवतीं समोरच्या राशीतून फिरतोसें दिसते त्या गमनमार्गास क्रांतिवृत्त म्हणतात.’ - सूर्य १२. [सं.]
क्रांतिमार्ग पु. बंडखोरीचा मार्ग; आमूल परिवर्तनाचा मार्ग; राज्यक्रांतिकारक चळवळ : ‘क्रांतिमार्ग क्रममार्गापेक्षां नेहमीच वाईट असतो असे नाहीं. पण बहुधा तो वाईट असतो.’ - सुदे १३१. [सं.]
क्रांतिसूत्र न. याम्योत्तर वृत्ताची रेषा. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
क्रिडाछेदी वि. खेळाडू.
क्रिप्त पु. (शाप.) हवेत अतिसूक्ष्म प्रमाणात असणारा एक वायू. [इं. क्रिप्टॉन]
क्रिप्तन पु. (शाप.) हवेत अतिसूक्ष्म प्रमाणात असणारा एक वायू. [इं. क्रिप्टॉन]
क्रिमि पु. जंतू; किडा; कीटक. [सं. कृमि]
क्रिमी पु. जंतू; किडा; कीटक. [सं. कृमि]
क्रियमाण क्रिवि. १. चालू क्रिया (जी केली जात आहे अशी); हातातील काम, गोष्ट : ‘प्रारब्धाचे शिळे दही व क्रियमाणाची दूधसाय...’ – एवाका २७४. २. पुढील, भावी कार्य (जे व्हायचे ते); ज्याचा आरंभ करायचा ते कार्य. ३. पूर्व जन्मीचे जे संचित असते त्याचे या जन्मी भोगावे लागणारे बरेवाईट फळ किंवा पुढील प्रारब्धाचे कारणरूप अशी चालू जन्मातील बरीवाईट कृती; क्रियमाण प्रारब्ध. [सं.]
क्रिया स्त्री. १. कर्म; काम; कृत्य; करणी; कृती : ‘असेल माझी क्रिया बरी ।’ - वेसीस्व ३·६४. २. और्ध्वदेहिक कर्म; प्रेतसंस्कार विधी; उत्तरकार्य; क्रियाकर्मांतर. (क्रि. करणे.) : ‘करुनि क्रिया पित्याची गेला तो श्रितभवाब्धिसेतुकडे ।’ - मोवन १०·८३. ३. धार्मिक विधी. ४. कोणत्याही धंद्याचे, कामाचे विशिष्ट मुद्दे, गोष्टी; इतिकर्तव्यता. ५. (शपथ, दिव्य, साक्षी, कागदपत्र इत्यादिकांवरून) खरे ठरविणे; सिद्ध करणे; शपथ; दिव्य; साक्ष; प्रमाण; पुरावा : ‘क्रिया करी तुम्हां न वजे पासुनि ।’ - तुगा १८. ६. (वै.) औषधोपचार. ७. (व्या.) क्रियापद; धातूंचे अर्थ स्पष्ट करणारा व्यापार. ८. (संगीत) ताल धरण्याचा प्रकार. ह्यात दोन प्रकार आहेत. सशब्द व निःशब्द. ९. (सामा.) परिणाम. जसे :- रासायनिक क्रिया. [सं. कृ = करणे] (वा.) क्रिया असणे, जागणे, धरणे - एखाद्याचे उपकार आठवणे : ‘- आईच्या दुधाची क्रिया असलीच पाहिजे.’ - संन्यास ६०. क्रिया टाकणे, सोडणे, सांडणे, विसरणे - एखाद्याचा उपकार विसरणे; कृतघ्न होणे.
क्रिया अनुसंधान न. क्रियाकर्म; एकानंतर दुसरी क्रिया, त्याचा संबंध.
क्रियाअक्षमता स्त्री. (वै.) अर्धांगवायू झालेला नसताही इंद्रिये किंवा गात्रे काम न करू शकणे - ही अवस्था. [सं.]
क्रियाकरण न. आचरण.
कियाकर्म न. आचरण.
क्रियाधर्म न. आचरण.
क्रियाकर्म   पहा : क्रिया ३ [सं. क्रिया + कर्मन्]
क्रियाकर्मांतर   पहा : क्रिया २ [सं.]
क्रियाकलाप   पहा : क्रिया ४ : ‘परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दीसे बरवा ।’ - राज्ञा ४·९४. [सं.]
क्रियाकांड न. कर्मकांड; ठरावीक नियमांना धरून वागणे. [सं.]
क्रियाकौशल्य न. क्रिया करण्याची हातोटी; कामातील कुशलता; वाकबगारी. [सं.]
क्रियागुणांक पु. (मानस.) व्यक्तीचे भाषण किंवा लिखाण यांमधील क्रियावाचक शब्द (क्रियापद) आणि विशेषण यांचे गुणोत्तर.
क्रियाचक्र न. ठरावीक कालमर्यादेत होणारे क्रियेचे वर्तुळ.
क्रियादेशधानी स्त्री. लायब्ररी (संगणक).
क्रियाद्वेषी वि. (कायदा) खटल्यात ज्याची साक्ष अपायकारक होते असा (साक्षीदारांच्या पाच प्रकारांपैकी एक).
क्रियानष्ट वि. १. कृतघ्न. २. स्वतःचे वचन न पाळणारा; खोटा : ‘नव्हे क्रियानष्ट तुम्हां ऐसा ।’ - तुगा १९११.
क्रियापद न. ज्याच्यापासून पुरुष, लिंग, वचन, काळ यांचा बोध होतो असे धातूला प्रत्यय लागून बनलेले वाक्यातले रूप.
क्रियापरता स्त्री. (संगीत) अभ्यासतत्परता. [सं.]
क्रियापंजर पु. प्राण्यांच्या सामान्य अनुक्रियांची नोंद करण्याची व्यवस्था असलेला पिंजरा.

शब्द समानार्थी व्याख्या
क्रियापार पु. मृत्यूनंतरचे धार्मिक विधी पुरे करणे; अंत्यविधी : ‘तेयाचे क्रियापारु करितां उसीरु लागैल :’ - लीचपू ८५.
क्रियाप्रचोदन न. (मानस.) केवळ वर्तन करण्याची प्रेरणा.
क्रियाबंध पु. १. (मानस.) प्रतिक्षेपसदृशक्रिया; परिणामांचा विचार न करता फक्त वर्तनाच्या दृष्टिकोनातून पाहिलेला क्रियेचा दुवा; वर्तनसंधान. २. (भाषा) वाक्यातील क्रिया व्यक्त करणारा एक शब्द वा अनेक शब्दांचा समुदाय.
क्रियाबाल वि. १. (कायदा) अज्ञान; अप्रौढ (माणूस); देणे, घेणे इ. व्यवहार करायला ज्याला कायद्याने प्रौढत्व प्राप्त झाले नाही असा. २. असमर्थ; नालायक (माणूस-देवघेवीत).
क्रियाभ्रष्ट वि. १. वचनभ्रष्ट; वचन, शपथ न पाळणारा. २. कृतघ्न; उपकार न जाणणारा. ३. नित्यनैमित्तिक कर्मे न करणारा; धर्मभ्रष्ट.
क्रियारूप न. (व्या.) क्रियापदाचे वचन, पुरुष, काल इ. भेदाने होणारे रूप.
क्रियारोधी (काच)   (शा.) अनेकविध द्रव्यांचा सहजासहजी परिणाम न होणारी (काच).
क्रियायोग पु. तप, स्वाध्याय व ईश्वराची ध्यानधारणा.
क्रियावाद पु. क्रिया, विकार इ. गोष्टी आत्म्यावर आपली छाप बसवितात असे प्रतिपादणारे एक मत; वैशेषिक व जैन तत्त्वज्ञान यातून हा वाद सापडतो. हा वेदांत, सांख्य, योग, बौद्धमत यातून दिसतो.
क्रियावान वि. शास्त्राप्रमाणे विहित आचरण करणारा; नित्य - नैमित्तिक नियम पाळणारा : ‘जो वेदार्थ करणार पंडित । त्याहून अनुष्ठानी क्रियावंत । शतगुणें आगळा ।’ - ह ३४·१००. [सं.]
क्रियावंत वि. शास्त्राप्रमाणे विहित आचरण करणारा; नित्य - नैमित्तिक नियम पाळणारा : ‘जो वेदार्थ करणार पंडित । त्याहून अनुष्ठानी क्रियावंत । शतगुणें आगळा ।’ - ह ३४·१००. [सं.]
क्रियाविधिवाद पु. (तत्त्व.) अमुक एका पद्धतीने नियमबद्ध कर्म करण्याची रीत म्हणजेच कर्मकांड; आचार, कर्मकांड यावर भर असणारा वाद, मत. [सं.]
क्रियाविभव न. (मानस.) मज्जा किंवा स्नायू यांच्या कार्याशी संबंधित होणारा विद्युतविभव.
क्रियाविशेषण न. ज्या शब्दाच्या योगाने क्रियेच्या गुणाचा अथवा प्रकाराचा, किंवा अमुक एका विशिष्ट अवस्थेचा बोध होतो तो शब्द. जसे :- तो हळू चालतो. काही क्रियाविशेषणे मूळ नामांची विभक्त्यंत रूपे असतात. उदा. बुद्ध्या. [सं.]
क्रियाविज्ञान न. शरीरांतर्गत चयापचयातील (पचन, शोषण, अभिसरण इ.) अनेक क्रियाविक्रियांसंबंधीची माहिती.
क्रियाशील वि. १. धार्मिक नियम पाळणारा; तत्त्वाला धरून वागणारा. २. प्रत्यक्ष कार्य करणारा कोणत्याही संस्थेचा सदस्य; उद्योगी. जसे :- क्रियाशील कार्यकर्ता. [सं.]
क्रियाशील किरण   (भौ.) उत्सर्जनक्षम किरण.
क्रियाशील थर   (भूशा.) ज्या थरामध्ये किरणोत्सर्गदृष्ट्या क्रियाशील खनिजे आहेत असा खडकाचा थर.
क्रियाशील प्रारण   (भौतिक, रसा.) दृश्य किंवा अदृश्य परंतु रासायनिक बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेले विशेषतः अदृश्य प्रारण. [सं.]
क्रियाशील भांडवल   (अर्थ.) उत्पादनासाठी प्रत्यक्ष वापरात असलेले भांडवल.
क्रियाशून्य वि. निष्क्रिय. [सं.]
क्रियाश्रय पु. (व्या.) कर्ता (क्रियापदाचा); क्रियेचे प्रधान कारक. [सं.]
क्रियासंस्था स्त्री. प्रतिक्रियेशी संबंधित मज्जा, स्नायू व ग्रंथिसमूह.
क्रियांगराग पु. (संगीत) शास्त्रातील नियम कायम ठेवून विचित्रतेसाठी विवादी स्वरांचा उपयोग ज्या रागात केला जातो असा राग. [सं.]
क्रियोपन्यास पु. प्रमाणांचे प्रतिपादन; पुरावा दाखविणे. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
क्रिंतन स्त्री. (सं.) मुरकी.
क्रीड न. ध्येय; अंतिम हेतू; आद्यतत्त्व : ‘जुन्या पक्षानें राष्ट्रीय सभेचे अंतिम हेतू किंवा क्रीड कायम ठरवून...’ - लोटिकेले ३·२६३. [इं.]
क्रीडणे अक्रि. खेळणे; मौज करणे; विलास करणे : ‘धन्य धन्य तें नंदाचे आंगण । जेथे क्रीडे मनमोहन ।’ - हरि ५·१७७. [सं. क्रीडा]
क्रीडन न. स्त्री. १. खेळ; मौज; विलास; लीला; मनोरंजन; करमणूक. २. परमार्थाखेरीजचा व्यवहार. ३. मैथुन; सुरत : ‘क्रीडा करो तुजसवें ललना पलंगीं ।’ - र ३.
क्रीडा न. स्त्री. १. खेळ; मौज; विलास; लीला; मनोरंजन; करमणूक. २. परमार्थाखेरीजचा व्यवहार. ३. मैथुन; सुरत : ‘क्रीडा करो तुजसवें ललना पलंगीं ।’ - र ३.
क्रीडनकोप पु. प्रणयकोप; खोटा राग. [सं.]
क्रीडाकोप पु. प्रणयकोप; खोटा राग. [सं.]
क्रीडनकौतुक न. चित्तविनोद; करमणूक; गंमत. [सं.]
क्रीडाकौतुक न. चित्तविनोद; करमणूक; गंमत. [सं.]
क्रीडनपाश पु. फासा; अक्ष (खेळण्याचा).
क्रीडापाश पु. फासा; अक्ष (खेळण्याचा).
क्रीडनमार्ग पु. खेळातून शिक्षण. (प्राथमिक शिक्षण आ १९४८)
क्रीडनमृग पु. १. करमणुकीसाठी बाळगलेले जनावर (हरिण, वानर) : ‘पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा चले ।’ - ज्ञा ११·१७०. २. (ल.) काठीचा घोडा; खेळवणा. ३. दुसऱ्याच्या कह्यात वागणारा माणूस; ताटाखालचे मांजर; लाळघोट्या माणूस. [सं.]
क्रीडामृग पु. १. करमणुकीसाठी बाळगलेले जनावर (हरिण, वानर) : ‘पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा चले ।’ - ज्ञा ११·१७०. २. (ल.) काठीचा घोडा; खेळवणा. ३. दुसऱ्याच्या कह्यात वागणारा माणूस; ताटाखालचे मांजर; लाळघोट्या माणूस. [सं.]
क्रीडाउपचार पु. (मानस.) मुलांच्या मानसशास्त्रातील एक प्रक्रिया. मुलांच्या खेळांच्या विषयावरून त्यांच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज बांधण्याची पद्धत.
क्रीडावृत्ति स्त्री. (मा.शा.) खेळण्याची उपजतबुद्धी, सहजप्रवृत्ती, स्वभाव.
क्रीडांगण न. ज्या ठिकाणी क्रिकेट, खो खो, कबड्डी इ. मोठे उघड्यावरचे खेळ खेळले जातात असे मैदान किंवा मोकळी जागा. [सं.]
क्रीडास्थान न. ज्या ठिकाणी क्रिकेट, खो खो, कबड्डी इ. मोठे उघड्यावरचे खेळ खेळले जातात असे मैदान किंवा मोकळी जागा. [सं.]
क्रीत स्त्री. क्रिया; कृती. [कृति अप.]
क्रीत पु. १. विकत घेतलेला मुलगा; बारा वारसांपैकी एक. २. दासांतील एक भेद.
क्रीत वि. विकत घेतलेले; खरेदी केलेले. २. विकलेले. [सं.]
क्रीतानुशय पु. विकत घेतलेली वस्तू विकणाऱ्याला परत करणे; पसंत न पडलेल्या खरेदीचा व्यवहार. [सं.]
क्रील न. (वस्त्रोद्योग) सुताने भरलेल्या बॉबिन्स बसविण्याची चौकट.
क्रुद्ध वि. रागावलेला; कुपित : ‘एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धे एकें ॥’ - ज्ञा ११·१२६. [सं.]
क्रुद्धदृष्टि स्त्री. (नृत्य) दृष्टीमध्ये कठोरता व निश्चलता (पापण्या आणि बुबुळे निश्चल ठेवून) दाखविणे. क्रोधाचा भाव दाखविण्यासाठी या अभिनयाचा उपयोग करतात. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
क्रुद्धदृष्टी स्त्री. (नृत्य) दृष्टीमध्ये कठोरता व निश्चलता (पापण्या आणि बुबुळे निश्चल ठेवून) दाखविणे. क्रोधाचा भाव दाखविण्यासाठी या अभिनयाचा उपयोग करतात. [सं.]
क्रुम न. १. (शाप.) एक मूळ धातू, द्रव्य. २. (चर्मकार) गाय, म्हैस यांचे पांढऱ्या रंगावर कमावलेले कातडे. ३. एका विशिष्ट प्रकाराने कमावलेले उंची कातडे. [इं. क्रीम]
क्रुमाम्ल न. (शाप.) एक अम्ल. हा हिरव्या रंगाचा घन पदार्थ आहे.
क्रूझर न. एक लढाऊ गलबत. आपल्या युद्धनौकांचे संरक्षणार्थ व शत्रूच्या युद्धनौकांच्या नाशार्थ युद्धकालात अशी गलबते ठेवतात. [इं.]
क्रूर वि. १. निर्दय; कठोर; कृपाहीन; निष्ठुर : ‘परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी ।’ - ज्ञा १६·२५७. २. भयंकर; उग्र; भीतिदायक. ३. प्रचंड; धडाक्याने जाणारी, वाढणारी (आग इ.). ४. अमानुष; फाजील; रानटी (वर्तन, कृत्य). ५. हिंसक; हिंस्त्र (प्राणी). [सं.]
क्रूस पु. १. वधस्तंभ. या खांबावर प्रभू येशूख्रिस्ताला खिळून मारले : ‘येशूला जेथें क्रूसावर खिळलें होतें तें ठिकाण शहराच्या जवळच होतें.’ - यौहा १९·२०. २. येशूख्रिस्ताचे मृत्युसूचक चिन्ह ✞. ख्रिस्ती धर्मचिन्ह. ३. आत्मयज्ञाची तयारी. ४. ख्रिस्ताबरोबर व ख्रिस्ताकरता दुःख सहन करणे.
क्रेतव्य वि. १. विकत घेण्यास योग्य. २. विकायला योग्य. [सं.]
क्रेय वि. १. विकत घेण्यास योग्य. २. विकायला योग्य. [सं.]
क्रेता वि. १. विकत घेणारा. २. विकणारा. [सं.]
क्रेन स्त्री. जड वजन उचलण्याची यारी. [इं.]
क्रेप न. एक प्रकारचे रेशमी कापड.
क्रेप वि. कुरुळे, चुण्या, आढ्या असलेले.
क्रोड पु. स्त्री. एक कोटी संख्या. [सं. कोटि]
क्रोड न. पु. १. छाती; ऊर. [सं.], २. डुक्कर; वराह : ‘तया क्रोडरूपें हिरण्याक्ष मेला ।’ - वामन नृसिंह दर्पण १५. [सं.], ३. ग्रंथामध्ये असलेली न्यूनता, दोष (अर्थ इत्यादीची) ग्रंथाखेरीजच्या दर कागदावर लिहून ठेवतात ते कागद; शुद्धिपत्र; पुरवणीदुरुस्ती. [सं.]
क्रोडपत्र न. पु. ग्रंथामध्ये असलेली न्यूनता, दोष (अर्थ इत्यादीची) ग्रंथाखेरीजच्या दर कागदावर लिहून ठेवतात ते कागद; शुद्धिपत्र; पुरवणीदुरुस्ती. [सं.]
क्रोड कुऱ्हाड   १. (पुरा.) कठीण मध्यभाग असणारी कुऱ्हाड; मूळ दगडाला कुऱ्हाडीसारखा आकार देऊन केलेली कुऱ्हाड. अशा तऱ्हेच्या कुऱ्हाडी आद्यअश्मयुगात सापडतात.
क्रोडीकरण न. १. आलिंगन. २. समावेश; विषयीकरण. [सं.]
क्रोडोपति पु. कोट्यधीश. [सं.]
क्रोडोपती पु. कोट्यधीश. [सं.]
क्रोध पु. राग; कोप; संताप; त्वेष. [सं.]
क्रोधणे अक्रि. रागावणे; कोपणे; संतापणे. [सं. क्रोध]
क्रोधावणे अक्रि. रागावणे; कोपणे; संतापणे. [सं. क्रोध]
क्रोधा वि. (संगीत) नवव्या श्रुतीचे नाव. [सं.]
क्रोधाग्नि पु. भयंकर संताप; कोपानल. [सं.] (वा.) क्रोधाग्नि शिखा टाकणे, क्रोधाग्नी शिखा टाकणे - बेफामपणे बोलणे.
क्रोधाग्नी पु. भयंकर संताप; कोपानल. [सं.] (वा.) क्रोधाग्नि शिखा टाकणे, क्रोधाग्नी शिखा टाकणे - बेफामपणे बोलणे.

शब्द समानार्थी व्याख्या
क्रोधायमान वि. रागावलेला; क्रुद्ध. [सं.]
क्रोधिष्ठ वि. रागीट; शीघ्रकोपी; कोपिष्ट.
क्रोधी वि. रागीट; शीघ्रकोपी; कोपिष्ट.
क्रोधिष्ट वि. रागीट; शीघ्रकोपी; कोपिष्ट.
क्रोश पु. कोस (अंतर) : ‘अनादि पंचक्रोशक्षेत्र ।’ - ज्ञा १८·१८०४. [सं.]
क्रोशाची सुई स्त्री. दोरा विणून त्याचे रुमाल, पिशवी इ. करण्याची टोकापाशी वाकडी असणारी सुई.
क्रोष्ट पु. कोल्हा; जंबूक : ‘घे पंचानन पांच क्रोष्टा दे मानवेल शितिकंठ ।’ - मोसभा ४·१९. [सं.]
क्रौन वि. १. (मुद्रण) वीस गुणिले पंधरा इंची आकाराचा (छापण्याचा कागद). २. लोखंडाचा एक प्रकार : ‘कमानीसाठी ताणाच्या सळ्या, क्रौन, बोलिंग... लोखंडाच्या असाव्या.’ - मॅरट २१. [इं.]
क्रौर्य न. क्रूरता; निर्दयपणा; निष्ठुरपणा; दुष्टपणा; पाषाणहृदयता. [सं.]
क्रौंच पु. करकोचा पक्षी. [सं.]
क्लब पु. मंडळ; संघ; मेळा; क्रीडास्थान; बैठकीची जागा. (अप.) कलप, कलब. २. (पत्ते) किलावर, फुलावर रंग. [इं.]
क्लम पु. थकवा.
क्लावर पु. हिरा; माणिक. (तंजा.).
क्लांत वि. दमलेला; थकलेला; भागलेला; कोमेजलेला. [सं.]
क्लांति स्त्री. थकवा; ग्लानी. [सं.]
क्लांती स्त्री. थकवा; ग्लानी. [सं.]
क्लिन्न वि. १. ओले झालेले; भिजलेले. २. विरलेले (पाण्यात). [सं.]
क्लिष्ट : वि. १. अवघड; दुर्बोध; कठीण; बेजार करणारे (काम, पुस्तक, विषय, मार्ग) : ‘काव्य दुर्बोध व क्लिष्ट होणे...’ - सासं ११३. २. ओढूनताणून आणलेला; कष्टाने जुळवलेला (अर्थ, विचार, योजना, स्पष्टीकरण). [सं.]
क्लीनर वि. साफसूफ करणारा; (विशेषतः) मोटार धुऊनपुसून साफ करणारा. पहा : किन्नर [इं.]
क्लीब पु. १. नपुंसक; षंढ : ‘न भजति सुयशस्काम क्लीबा आरोग्यकाम चिबुडाला ।’ - मोभीष्म १·६४. २. (ल.) पौरुषहीन; बायकी; भ्याड. २. खोजा; जनानखान्यावरील नोकर. [सं.]
क्लेद पु. १. घाम. २. आर्द्रता; ओलावा. [सं.]
क्लेदन न. १. ओले होणे; दमटणे; भिजणे. २. वितळणे; विरणे. ३. द्रवामुळे होणारी संयोगशिथिल अशी अवस्था; मऊ, सरबरीत होणे. पहा : सप्तोपचार [सं.]
क्लेश पु. त्रास; दुःख; श्रम; काच; यातना; व्यथा (सामान्यतः अनेकवचनी प्रयोग) : ‘झोंबती तरी क्लेशा । पात्र होती ॥’ - ज्ञा १२·७४. [सं.]
क्लेशणे उक्रि. त्रासणे; दुःखी होणे; छळणे; पीडणे : ‘अन्य क्लेशें क्लेशत जाये । तो येक धन्य संसारीं ।’ - मुआदि २·६५. [सं. क्लिश्.]
क्लेशदान न. आजारी माणसाचे पुष्कळ दिवसांचे दुखणे (पाप) जावे म्हणून उडीद, तेल इ. चे दिलेले दान. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
क्लेशी वि. दुःखी; पीडित; कष्टी; व्यग्र : ‘बहुक्लेशी झाल्या श्रवणिं पडतां हें द्विजसत्या ।’ - वामन यज्ञपत्न्याख्यान ५०. [सं.]
क्लेशित वि. दुःखी; पीडित; कष्टी; व्यग्र : ‘बहुक्लेशी झाल्या श्रवणिं पडतां हें द्विजसत्या ।’ - वामन यज्ञपत्न्याख्यान ५०. [सं.]
क्लैब्य न. १. नपुंसकत्व; हिजडेपणा. २. (ल.) भीरुता; अपौरुष. [सं.]
क्लोरिन न. पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे औषध. [इं.]
क्लोरिन पु. (रसा.) अधातुरूप मूलद्रव्य. यापासून निर्माण होणारा वायू हिरवट पिवळ्या रंगाचा व तीक्ष्ण वासाचा असून विषारी असतो. विरंजक म्हणून उपयोग.
क्लोरोफार्म पु. (वै.) रोग्यावर शस्त्रक्रिया करताना गुंगी आणण्यासाठी उपयोगात आणले जाणारे द्रवरूप औषध.
क्वचित क्रिवि. कोठे तरी; तुरळक; विरळा; सर्वत्र नाही असे. [सं.]
क्वणत वि. मधुर आवाज करणारी (किंकिणी, नुपूर इ.) : ‘केयूरें भुज पारिजात फुलले, माजी क्वणत् किंकणी ।’ - र (गजेन्द्रमोक्ष) ६३. [सं.]
क्वणन वि. मधुर आवाज करणारी (किंकिणी, नुपूर इ.) : ‘केयूरें भुज पारिजात फुलले, माजी क्वणत् किंकणी ।’ - र (गजेन्द्रमोक्ष) ६३. [सं.]
क्वणित न. किणकिण; मधुर आवाज (नुपूर, पैंजण यांचा). [सं.]
क्वथन न. कढणे; काढा. [सं.]
क्वाडका   १. अडसर, अडकण. २. अर्धगोल, अंतरगोल मणी-पुली. ३. सूत काढण्यासाठी रहाटास बसविलेले लाकडी चाक.
क्वाथ पु. १. औषधांचा काढा; कढविलेला पदार्थ. २. कात. [सं.]
क्वापि क्रिवि. कोठेही. [सं.]
क्वार स्त्री. कुवारी. पहा : कुमारी : ‘तेव्हां ते मातेनें सकरुणकरें क्वारि धरली ।’ - सारुह ७·१७३. [सं. कुमारी]
क्वारी स्त्री. कुवारी. पहा : कुमारी : ‘तेव्हां ते मातेनें सकरुणकरें क्वारि धरली ।’ - सारुह ७·१७३. [सं. कुमारी]
क्वारंटी न. नैसर्गिक साथीच्या रोगाने दूषित असलेल्या ठिकाणचा मनुष्य गावाबाहेर काही दिवस ठेवण्याची व्यवस्था : ‘बसले क्वारंटी । परगांवीं जाण्यास पाहिजे, सुभेसाहेबाची पासचिठ्ठी ।’ - गापो ११३.
क्वार्टर   राहण्याचे सरकारी घर; लष्कराची बराक. (गो.) [पोर्तु.]
क्विनाईन   पहा : कोयनेल
क्विनिन   पहा : कोयनेल
क्विंटल   १००० कि.ग्रॅ. वजन.
  मराठी वर्णमालेतील सतरावे अक्षर आणि दुसरे व्यंजन.