शब्द समानार्थी व्याख्या
शअ १. निश्चय, खात्री, स्पष्टपणा, वैशिष्ट्य दाखवणारे शब्दयोगी अव्यय. उदा. तुम्हीच या = इतरांस न पाठवता तुम्ही स्वतः या; तुम्ही याच = कसेही करून, न चुकता या; तो चोरच आहे = तो चोरीचाच धंदा करणारा आहे; तो चोर आहे = इतर कोणी नाही तो स्वतः चोर आहे; मी जेवताच उठलो = जेवण होताक्षणी उठलो; मी येर्इनच = येर्इनच येर्इन (खात्रीने, निःसंशय मी येर्इन). २. या अव्ययाला कधी गुणदर्शक अर्थ असतो. उदा. एवढाच. ३. सदृश; सारखा. उदा. असाच. [सं.]
  मराठी वर्णमालेतील एकविसावे अक्षर व सहावे व्यंजन. याचा उच्चार मराठीत दोन प्रकारे होतो. १. तालव्य. २. दंतमूलीय. तालव्य :- चहा, चमत्कार इ., दंतमूलीय :- चमचा, चवरी, चव इ.
चइणे अक्रि. जागा होणे : ‘चइला तव लटके ।’ - चसिसू ५३. [सं. चित्]
चइत्य न. चिंतनीय विषय : ‘तैं चित्त चैत्यत्यागें । मातें चि भजें ।’ - राज्ञा १८·१२६१; ‘ऐसें चइत्य जातें सांडिले ।’ - राज्ञा १८·१२६२.
चैत्य न. चिंतनीय विषय : ‘तैं चित्त चैत्यत्यागें । मातें चि भजें ।’ - राज्ञा १८·१२६१; ‘ऐसें चइत्य जातें सांडिले ।’ - राज्ञा १८·१२६२.
चर्इ स्त्री. १. केस किंवा लोकर ज्यात झडते असा रोग; कातर; उंदरी. पहा : चार्इ (क्रि. लागणे.) २. गुरांचा एक रोग.
चउक पु. चौथरा : ‘त्याणें उत्तनास चउक बांधिला ॥’- मब ३६.
चउत्रा पु. चौथा भाग; चौथ; चतुर्थांश. [सं. चतुर्थ]
चउदशी स्त्री. शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील चौदावा दिवस; चतुर्दशी.
चउर वि. चतुर; जाणता : ‘नेणा आणि चउरा ।’ - राज्ञा १५·३८७.
चउरा पु. चौक; चव्हाटा; चौकी : ‘येतें समयी बऱ्हाणपुरास गेलो. तेथे चउऱ्यावर कागदाची चौकसी केली.’ - पेद ४·२२. [हिं. चौराह]
चक पु. १. हद्द किंवा हद्दींचा नकाशा : ‘मेढीयातून काम पाच हात उंच आहे त्याचा चकहि काढून पाठविला असे.’ - ऐको ३६०. २. हक्काची रक्कम; दस्तुरी; कर; फी. ३. मालकीची, वाट्याला आलेली जमीन; नंबर; क्षेत्र. ४. लागवड करावयास घेतलेली सलग, मोठी, जमीन; जमिनीचे मोठे क्षेत्र. यावरून एखाद्या गावास मिळालेले नाव. ५. विभागलेल्या जमिनीचा एक भाग; तुकडा; जुन्या जमाबंदी दप्तरातून याचा अर्थ गावकऱ्यांकडून घेऊन तिऱ्हाइतास लागवडीकरता दिलेली जमीन असा आहे. जमीन मोजणीत याचा अर्थ एका नंबरातील दुसरे शेत असा आहे. [फा.]. ६.हुकूमनामा; (काजीने दिलेला) फतवा. ७.वचक; धाक; जरब; वजन; दरारा; पगडा (सत्ता, अधिकार यांचा); अप्रत्यक्ष अधिकारमान्यता. ८. कायदा; नियम; कानू; शासन; ठरलेली पद्धत.९. जुनी, नेहमीची पद्धत; रीत; वहिवाट. १०. (सरकारी नोकरांत रूढ) ताकीद; ठपका; कानउघाडणी. (क्रि. येणे, ठेवणे, चालणे.) [इं. चेक] (वा.) चक पुरवणे – चारी बाजूंकडून त्रास होणे. चक बसणे – खंबीर पायावर उभारणी होणे; मजबुती होणे; मजबुती होणे; पक्की व्यवस्था येणे; दरारा; दहशत बसणे : ‘त्या दिवसापासून दारू व मांस शहरात विकू नये असा चक बसला.’ - शिप्रब ६९.११. तंबाखूच्या पानांच्या राशीवरचे झाकण.
चक क्रिवि. १. चकचकीत; स्वच्छ : ‘घरामधी चार दोनच भांडी पन कसी... चक’ – लोसाको. ‘दिले जरी पोषाख स्वामीला चक दौलतरायाने ।’ - सला ५२. २. पहा : चक्क :
चक   १. दर्शनी हुंडी. २. ठक. (प्रा.)
चकचक क्रिवि. १. चकचकीतपणाने; डोळे दिपून जाण्यासारखे; झककन्; लखलख : ‘चकचक चुकावेना । चाट चावट चळावेना ।’ - दास १४·४·६. २. स्पष्टपणे. पहा : चक्क २.कुत्रे पाणी पीत असताना, चाटताना, पिताना होणाऱ्या आवाजाप्रमाणे : ‘कृष्णाने ओंजळीत पाणी घेतले व तो चकाचका करीत प्यायला.’ - वाघसिंह ४६. [ध्व.]
चकचक वि. पहा : चकचकीत
चकचक पु.न. चकचकीत पदार्थ, गोष्ट; चकचकाट. [सं.चक्]
चकाचका क्रिवि. कुत्रे पाणी पीत असताना, चाटताना, पिताना होणाऱ्या आवाजाप्रमाणे : ‘कृष्णाने ओंजळीत पाणी घेतले व तो चकाचका करीत प्यायला.’ - वाघसिंह ४६. [ध्व.]
चकचकणे अक्रि. १. चकचक, चुकचुक आवाज काढणे; चुकचुकणे (पाल, साप इत्यादींनी). २. (ल.) खेद करणे; दुःख करणे; चक असा ध्वनी काढणे (हळहळण्याच्या वेळी तोंडातून चक असा ध्वनी निघतो त्यावरून) : ‘येक झडा घालूं जातीं । लंडी चकचकून पळती ।’ - दावि ४०३. [ध्व.] [सं. चक्] ३.प्रकाशणे; लकाकणे; चमकणे; झळकणे. [सं. चक्]
चकचकाट पु. १. लखलखाट; झगमगाट; तेज : ‘अपूर्वार्इच्या चकचकाटाने ते दिपून गेलेले नाहीत.’ - सामा १८८. २. स्वच्छता.
चकचकावणे अक्रि. (माकड, पक्षी इत्यादींनी) चकचक असा आवाज करणे. [ध्व.]
चकचकाविणे अक्रि. कानशिलावर चपराक मारणे; थोबाडीत लगावणे.
चकचकी स्त्री. १. तेज; प्रभा. २. लकाकी; उजाळा. [सं.चक्]
चकचकीत वि. १. सतेज; झळझळीत; लकलकीत; प्रकाशमान; चमकणारे. २. (ल.) झकपक; चापचोप; नीटनेटका; स्वच्छ; व्यवस्थित; ठाकठीक; नीटस; सुरेख (माणसे, वस्तू, स्थळे इ.). [सं. चक्]
चकचूर   पहा : चकाचूर : ‘चकचूर करिति कर ऊर चरण शिर सूरकुलज रणशूर तदा ।’ - आय २९; ‘कपि बैसता जरी वरी । तैं होता चकचुरी निर्नाम ।’ - भारा किष्किंधा १७·१२४.