शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी वर्णमालेतील बत्तिसावा वर्ण व सतरावे व्यंजन.
थई क्रि. येणे – नागाको.
थकणे अक्रि. १. दमणे; शिणणे; चालवेनासे होणे; भागणे. २. शक्ती क्षीण होणे; (रोग, म्हातारपण इ. मुळे) बेजार होणे. ३. मती गुंग होणे; बुद्धी न चालणे. ४. दिवाळे निघणे; पैसा नसल्यामुळे व्यापार थांबणे. ५. कर्जाऊ दिलेली रक्कम बुडणे. [सं. स्थग्]
थकबाकी स्त्री. एकूण येण्यापैकी शिल्लक राहिलेली रक्कम.
थकले कूळ   दिवाळे निघाल्यामुळे किंवा अतिशय गरिबीमुळे कर्ज फेडण्यास असमर्थ असलेली व्यक्ती.
थकले मांदले वि. थकले भागलेले; शिणलेले.
थकवा पु. १. अतिश्रमाने इंद्रियांना येणारी ग्लानी, शिथिलता; गळणे; दमणूक. २. कुठल्याही पेशीला सतत उत्तेजित करत गेल्यास ती पेशी थकते व काम करू शकत नाही (कारण सततच्या उत्तेजनामुळे पेशीत रासायनिक बदल होतात) ती अवस्था. (ही गंभीर आजाराची निदर्शक असू शकते.) (इं.) फटिंग. [हिं. थकान; त. शवक्कम्]
थकित वि. मुदतीत वसूल न झालेले, न फेडलेले (कर्ज). [सं. स्थग्]
थकीत वि. १. चकित; आश्चर्ययुक्त : ‘थक्कित होऊनि जन हे पाहती हर्षें परमार्थ ।’ – मुक्तेश्वरकृत कटिबंध पृ. ४. २. गोंधळलेला; बावरलेला; गुंग झालेला; गडबडलेला. ३. अद्भुत; आकस्मिक. [सं. स्थगित]
थक्कित वि. १. चकित; आश्चर्ययुक्त : ‘थक्कित होऊनि जन हे पाहती हर्षें परमार्थ ।’ – मुक्तेश्वरकृत कटिबंध पृ. ४. २. गोंधळलेला; बावरलेला; गुंग झालेला; गडबडलेला. ३. अद्भुत; आकस्मिक. [सं. स्थगित]
थक्कीत वि. १. चकित; आश्चर्ययुक्त : ‘थक्कित होऊनि जन हे पाहती हर्षें परमार्थ ।’ – मुक्तेश्वरकृत कटिबंध पृ. ४. २. गोंधळलेला; बावरलेला; गुंग झालेला; गडबडलेला. ३. अद्भुत; आकस्मिक. [सं. स्थगित]
थक्क वि. १. चकित; आश्चर्ययुक्त : ‘थक्कित होऊनि जन हे पाहती हर्षें परमार्थ ।’ – मुक्तेश्वरकृत कटिबंध पृ. ४. २. गोंधळलेला; बावरलेला; गुंग झालेला; गडबडलेला. ३. अद्भुत; आकस्मिक. [सं. स्थगित]
थट पु. स्त्री. १. समुदाय; जमाव; गर्दी; चेप; रगडा. (क्रि. लागणे). २. दाट रचना, मांडणी. (क्रि. जमणे, बसणे.). [क. थट्टु]
थटकारणे उक्रि. १. रचना करणे; व्यवस्थेने लावणे, ठेवणे (विशेषतः देखाव्यासाठी); (पोशाख इ.) घालणे. २. उत्तम रीतीने, थाटाने, सफाईने संपवणे, करणे.
थटकारणे अक्रि. स्वतःचा दिमाख मिरवणे; डौल दाखवणे; ऐट, थाटमाट करणे.
थटकावून क्रिवि. एकदम; धाडदिशी; जोराने; आवेशाने : ‘हे ऐकून दौला निजले होते ते थटकावून उठोन बसले.’ –मइसा ७·११५. [ध्व.]
थटणे अक्रि. १. दिमाखाने चालणे, बोलणे, वागणे; सजणे; नटणे. [सं. तट्], २. दोन वस्तू एकमेकींना घासल्या जाणे, टेकणे, आपटणे : ‘वंचाच्या हातातल्या बाटल्या एकमेकींना थटून आवाज करीत होत्या.’ – व्यंमाक. ३. अडकणे; खोळंबणे : ‘ए मास्तर, एक बैल बगून दे की मला. पेरनी थटली गा!’ – बनगर.
थटथट क्रिवि. अडखळत : ‘कळा हे दावी कीं थटथट वदे क्रोधविकला.’ – भामा २२.
थट्टा स्त्री. दुसऱ्याला चीड येण्याजोगी चेष्टा, विनोद; वाकुल्या; उपहास; टवाळी. (क्रि. करणे) [हिं. ठठ्ठा] (वा.) थट्टेवारी नेणे –गंभीर विषयाला विनोदाचे रूप देणे, तुच्छ मानणे; विचारात न घेणे; हसण्यावारी नेणे; निर्लज्जपणे हसणे.