शब्द समानार्थी व्याख्या
  १. मराठी वर्णमालेतील तेहतिसावे अक्षर व अठरावे व्यंजन. २. (सांके.) १. हे अक्षर इतर वर्णांच्या लोकांकडून ब्राह्मणांना जाणाऱ्या पत्रांच्या सुरुवातीला ‘दंडवत’ या अर्थी लिहीत. २. ब्राह्मणांकडून इतरवर्णीयांना जाणाऱ्या उलट पत्रांमध्ये आशीर्वाद, कल्याण यांचे वाचक म्हणून पत्राच्या प्रारंभी लिहीत.
दकार   (सांके.) १. हे अक्षर इतर वर्णांच्या लोकांकडून ब्राह्मणांना जाणाऱ्या पत्रांच्या सुरुवातीला ‘दंडवत’ या अर्थी लिहीत. २. ब्राह्मणांकडून इतरवर्णीयांना जाणाऱ्या उलट पत्रांमध्ये आशीर्वाद, कल्याण यांचे वाचक म्हणून पत्राच्या प्रारंभी लिहीत.
वि. देणारे. (समासात) सुख–द, दुःख–द, मोक्ष–द इ. [सं.]
दकणे क्रि. आज्ञा बघणे. (अहि.)
दखल पु. १. प्रवेश : ‘लढाई न होतां किल्ल्यांत दखल झाला.’ – राज ५·६२. २. ढवळाढवळ. ३. ताबा : ‘कुल राज्य आपलें, देखील कर्नाटकहि आपणांस सारें दखल आहे.’ – चित्रगुप्त १२०.
दखल वि. १. (हिशोबात इ.) प्राप्त झालेला; पोचलेला. २. मांडलेले; लिहिलेले. ३. ज्ञात; परिचित; श्रुत. (क्रि. करणे, कळविणे, देणे, सुचविणे.) : ‘राजबीज खरें हें… सर्वांस दखल आहे.’ – राज ८·१९८. [अर. दख्ल्] (वा.) दखल घेणे –विचारात घेणे; नोंद घेणे.
दखल स्त्री. इजा; धक्का; अपघात. (व.)
दखलगिरी स्त्री. १. माहिती; परिचय; (काम, ज्ञान इ. संबंधी) प्रावीण्य : ‘चारशें वर्षेंपर्यंत कोठें दखलगिरी अगर नांवही नाहीं.’ – वाडबाबा २·१५. २. देखरेख; (कामकरी लोकांवर) नजर ठेवणे. (क्रि. ठेवणे, राखणे.). ३. बातमी देणे; माहिती सांगणे. (क्रि. करणे, देणे.). ४. ढवळाढवळ : ‘बापाजी मुसल्मान यासी दखलगिरी करावयास गरज नाहीं.’ – राज १५·२९. ५. (ल.) उत्पन्न : ‘तुम्हांस कांहींच पर्गणेयांत दखलगिरी न जालीं.’ – राज १·२३१.
दखलदाद स्त्री. १. (सरकारी कागदपत्रांत रूढ) मिळवलेली माहिती; अनुभव. २. अनिर्णीत प्रकरणांची नोंद. (क्रि. करणे). [अर.]
दखलपात्र वि. पोलिसात नोंद घेण्यालायक (गुन्हा, तक्रार).
दखलबाज वि. (विशेषतः कागदपत्रांत) समाविष्ट, माहीत असलेला; अनुभवात असलेला; दाखल केल्यानंतर नमूद : ‘त्यापैकीं मजुरा द्यावयाचे करार केले तें दखलबाज बार केले असते.’ – वाडसमा १·१७५. समासात पुढील शब्दांशी जोडून दखलबाद–कलम–जमा–खर्च–मजकूर–रकम. [अर.]
दखलबाद वि. (विशेषतः कागदपत्रांत) समाविष्ट, माहीत असलेला; अनुभवात असलेला; दाखल केल्यानंतर नमूद : ‘त्यापैकीं मजुरा द्यावयाचे करार केले तें दखलबाज बार केले असते.’ – वाडसमा १·१७५. समासात पुढील शब्दांशी जोडून दखलबाद–कलम–जमा–खर्च–मजकूर–रकम. [अर.]
दखीण स्त्री. दक्षिण दिशा : ‘वीघ्नेश्वरा दखीण भागें ।’ –उषा ९·९४.
दखीण पु. दक्षिणेचा वारा. (गो.) [सं. दक्षिण]
दख्खन पु. नर्मदेच्या दक्षिणेचा प्रदेश; दक्षिण हिंदुस्थान. [सं. दक्षिण]
दगटणे अक्रि. खेटून, चिकटून बसणे.
दगटली स्त्री. (पदार्थ ठेवण्याची) दगडी. (तंजा.)
दगड पु. १. धोंडा; शिळा; पत्थर; शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ. २. न्हावी लोकांचा वस्तऱ्याला धार लावण्याचा दगड; निष्णा.
दगड स्त्री. मोठा दगड; खडक; शिळा. (हा शब्द आणि या प्रकारचे इतर शब्द. उदा. दगडमाती, धोंडा, माती इ. शब्द; एखाद्या माणसाची बुद्धी, ज्ञान, मालमत्ता इ. कुचकामाची आहे असे दाखवायचे असताना उपयोगात आणतात.) [सं. दृषद्; क. दक्कड] (वा.) दगड उचकणे – >एखाद्याविरुद्ध कारस्थान करणे. दगड उचलणे, दगड घेणे, दगड हाती घेणे, दगड फेकणे, दगड मारणे, दगडमार करणे – >रागाने वेडावून जाणे; बेफाम रागावणे. दगड खाऊन दगड जिरविणे – अतिशय सशक्त कोठ्याचा असणे; काहीही पचवण्याची शक्ती असणे. (कर.) दगड चहूकडे टाकून पाहणे – प्रत्येक उपाय किंवा युक्ती योजून पाहणे; सर्व दिशांनी प्रयत्न करणे. दगड टाकून ठाव घेणे, दगड टाकून ठाव पाहाणे –तळ शोधणे अथवा खोली शोधण्याचा प्रयत्न करणे; खुबीदार प्रश्न विचारून दुसऱ्याच्या मनातील विचारांचा अंदाज बांधणे. दगडनि धोंडे – > (बायकी) सटरफटर, क्षुद्र गोष्टी. दगडाखाली हात सापडणे, दगडाखाली हात गुंतणे –काही दुःखकारक अडचणीत, पेचात, नुकसानकारक कामात सापडणे. दगडाखालून हात काढून घेणे –अडचणीच्या कामातून स्वतःला युक्तीने मोकळे करून घेणे. दगडाची साल काढणे, दगडाचा दोर काढणे –दुष्कर, अद्भुत किंवा अशक्य गोष्ट करणे. दगडाची छाती –१. साहसी; निर्भय; बेदरकार; धैर्यवान व सोशीक मनुष्य. २. धारिष्ट; प्रचंड धैर्य; दृढनिश्चय; दिलेरी. (क्रि. करणे.) दगडापरीस वीट मऊ, दगडापेक्षा वीट मऊ – (हाल, अपेष्टा इ.) दोन स्थितींची, गोष्टींची तुलना करून त्यातल्या त्यात एक बरी असे दाखविणे; निरुपाय म्हणून मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट पत्करणे. दगडाला पाझर आणणे, दगडाला पाझर निघणे, दगडाला पाझर फुटणे, दगडाला पाझर येणे, दगडाला पान्हा आणणे, दगडाचे दूध काढणे, दगडापासून दूध काढणे – १. नैसर्गिक नडी, अडचणी न जुमानता आपले हेतू सिद्धीला नेणे; अशक्य गोष्ट घडवून आणणे. २. कठीण हृदयाच्या अथवा कंजूष मनुष्याला दया आणणे. दगडावरची रेघ – कधीही न बदलणारी, खात्रीची, कायमची गोष्ट. दगडाशी गाठ पडणे – >कठोर, गळग्रह अथवा न देते कूळ इ. च्या तावडीत सापडणे. दगडाशी भांडणे –बलाढ्य शत्रू, मोठी अडचण, कठीण काम इ. शी झगडणे.